दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथ व रोटरी क्लब ऑफ ठाणे यांचा संयुक्त उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात अद्यावत शिक्षणाचे धडे मिळण्यासाठी रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथ व रोटरी क्लब ऑफ ठाणे (घोडबंदर रोड) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील डॉन बॉस्को विद्यालयातील इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या 150 विद्यार्थ्यांना मोफत ई लर्निंग स्टडी ॲप देण्यात आले.

रोटरी क्लबद्वारे आधुनिक शाळा इ लर्निंग आणि क्रिएटिव्ह लर्निंग प्रकल्पाद्वारे परिवर्तनशील भविष्यासाठी तरुणांना सक्षम करण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या अभियानातंर्गत 3132 रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथ आणि 3142 मधील रोटरी क्लब ऑफ ठाणे (घोडबंदर रोड) यांनी हा उपक्रम राबविला. शहराबरोबरच नेवासा तालुक्यातील सुदामराव मते पाटील हायस्कूल आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ज्ञानमाता बोर्डिंग स्कूलच्या दहावी (एसएससी) बोर्डातील विद्यार्थ्यांना देखील ई लर्निंग स्टडी ॲप देण्यात आले.

रोटरी ठाणे घोडबंदर येथील सचिव संतोष आंबेकर, प्रकल्प संचालक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना ॲप वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. रोटरी एम्पॉवरिंग युथच्या अध्यक्षा शीलू मकर, सचिव आरती म्हात्रे, प्रकल्प प्रमुख डॉ. बिंदू शिरसाठ, गीता बागी (मुंबई), सुशीला मोडक, नंदिनी जग्गी, असिस्टंट गव्हर्नर क्षितीज झावरे, साक्षरता संचालक दादासाहेब करंजुळे आदी उपस्थित होते.
फादर जेम्स, फादर रिचर्ड, पाटोळे सर आणि डॉन बॉस्को विद्यालयाचे कर्मचारी, नेवासा येथील सिस्टर बिंदू यांनी रोटरीशी समन्वय साधून हा प्रकल्प घडवून आनला. प्रथम कौशल्य विकास केंद्राचे दिवाकर भोयर, संगीता साळवे व त्यांच्या टीमने युवकांमध्ये संगीत, कला आणि विज्ञान या विषयात कौशल्य विकास करण्यासाठी कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केले.
या ॲपमध्ये इयत्ता दहावी बोर्डातील अभ्यासक्रम, संवादात्मक व्हिडिओ, प्रश्नमंजुषा, प्रश्नपत्रिका आणि असाइनमेंटचा समावेश आहे. या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना विविध विषयांची समज वाढते आणि गंभीर विचार व प्रभावी संवाद यासारख्या महत्त्वाच्या कौशल्य विकसित होतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी, महागडी पुस्तके व ऑनलाईन कोर्स परवडत नाही. विद्यार्थ्यांना मोफत दिलेले हे स्टडी ॲप विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर परीक्षेत अधिक चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होण्यास मदत होणार असल्याचे रोटरीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
