• Sat. Nov 1st, 2025

युवक काँग्रेसने एमआयडीसीच्या स्वागत कमानीत कापला बेरोजगारीचा केक

ByMirror

Sep 17, 2023

निदर्शने करुन पाळला राष्ट्रीय बेरोजगार दिवस

हाताला काम तर मिळाले नाही, मात्र चूकीच्या धोरणामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले -मोसिम शेख

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात वाढत चाललेली बेरोजगारी व 2 कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन देवून देशातील युवकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आल्याचा आरोप करुन अहमदनगर शहर युवक काँग्रेसच्या वतीने एमआयडीसीच्या स्वागत कमानी समोर रविवारी (दि.17 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारीचा केक कापण्यात आला. राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळून भाजप विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.


युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख, भिंगार ब्लॉक अध्यक्ष भूषण चव्हाण, मयुर पाटोळे, सागर इरमल, धीरज शिंदे, प्रवीण गीते, तौफिक शेख, अरबाज बेग, तौफिक जहागीरदार, मेहराज शेख, मुन्ना शेख, सुयोग कवडे, नफीस शेख, जितेंद्र यादव, सिकंदर साहनी, धरमेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, शैलेश साहनी, जितेंद्र साहनी, आकाश लोखंडे, अमित लोखंडे, अनिल राव आदींसह युवक कार्यकर्ते व बेरोजगार युवक सहभागी झाले होते.


वर्षाला दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्‍वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले. वर्षाकाठी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते, परंतु आजची तरुणांची परिस्थिती बिकट बनली आहे. कोट्यावधी सुशिक्षित युवकांना नोकऱ्या गमावलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातून अनेक उद्योग इतर राज्यात पळविण्यात आले. सरकारी आस्थापनांचे खासगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा घाट भाजपने घातला असल्याचा निषेध यावेळी आंदोलकांनी नोंदवला.


युवकचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख म्हणाले की, युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. मात्र युवकांना धार्मिक राजकारणात गुंतवून मुख्य प्रश्‍नापासून लक्ष विचलित करण्यात आले आहे. हाताला काम देण्याचे आश्‍वासन देवून भाजप सरकारने युवकांची फसवणूक केली आहे. हाताला काम तर मिळाले नाही, मात्र चूकीच्या धोरणामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडून अनेकांचा रोजगार बुडाला. मूठभर भांडवलदारांसाठी सत्ता राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.


मयूर पाटोळे म्हणाले की, युवकांच्या रोजगार प्रश्‍नी भाजपने युवकांच्या डोळ्यात धूळफेक केली. देशात जातीयवादी द्वेषाचे वातावरण निर्माण करुन युवकांच्या हाताला रोजगार न देता, त्यांच्या हातात लाठीकाठी देण्याचे काम सुरु आहे. युवकांना स्वतःचा प्रपंच चालविण्यासाठी व भविष्य घडविण्यासाठी रोजगार हवा आहे. युवकांनी जागृत होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *