• Tue. Nov 4th, 2025

गणेशोत्सव साजरा करण्यापासून कोणी कोणत्या मंडळास रोखू शकत नाही -दीप चव्हाण

ByMirror

Sep 16, 2023

महापालिकेला फक्त मांडवांना परवानगी देण्याचा अधिकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेला गणेशोत्सव मंडळांना गणपती बसवण्यासाठी फक्त मांडवांना परवानगी देण्याचा अधिकार  आहे. गणपती कोणत्या मंडळाने बसवावे हे सांगण्याचा अधिकार महापालिकेला नाही. महापालिकेने 13 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे परवानगी देण्याची ऑनलाईन अंमलबजावणी केलेली नसल्याने शहरात परवानगी देण्याचा वाद चिघळला असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे राज्य सचिव दीप चव्हाण यांनी केला आहे.


उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी एकदाच परवानगी देण्याबाबत महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने 13 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमीत केला आहे. यावर्षी घेतलेली परवानगी 2027 पर्यंत चालणार आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतांना निर्देश देण्यात आलेले आहे. जागेसाठी परवानगी सशुल्क नाममात्र भाडे शंभर रुपये घेण्याची तरतूद आहे.  पोलीस स्टेशन कडून ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाइन घेऊन परिपत्रकाप्रमाणे मनपाने ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्याचे निर्देशाचा यामध्ये समावेश आहे.


मात्र शहरात गणेश मंडळाच्या परवानगी वरून वादावादी सुरू आहे. आयुक्तांनी ही प्रक्रिया ऑनलाईन राबवून परवानगीचा प्रश्‍न निकाली काढण्याची आवश्‍यकता होती. महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 235 अन्वये परवानगी घेतली नाही, तर मनपा फक्त मंडळांना कायद्यानुसार दंड करू शकते. मात्र गणेशोत्सव साजरा करण्यापासून कोणी कोणत्या मंडळास रोखू शकत नसल्याचे दीप चव्हाण यांनी म्हंटले आहे.


महापालिका शासनाच्या निर्देशाप्रमाणे परवानगीचा विषय हाताळत नसल्याने गणेश मंडळांची हेळसांड होत आहे. गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन निर्णय आहे. मात्र नगरमध्ये गणेश मंडळांना परवानगी नाकारल्या जात आहे. गणेश मंडळासाठी मंजुरी द्यावी अथवा नाही, हा महापालिकेत कोणताही ठराव नाही व नियमावली नाही. फक्त  मंडप टाकण्यासाठी परवानगीची गरज आहे.  यासाठी वाहतूक शाखा व पोलीस स्टेशनचा ना हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. मात्र गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याचे दीप चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *