दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केल्या सूचना
फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटबंधारे विभागाने 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीस करार संपल्याचे कारण देवून व्यावसायिक गाळा खाली करण्याचे आदेश दिलेले असताना, दिव्यांगाच्या नातेवाईकांनी दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष ना. बच्चू कडू यांची भेट घेतली असता त्यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधून दिव्यांग व्यक्तीला करार वाढ करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. तर दिव्यांग व्यक्तीला आपला व्यवसाय नियमीत चालू ठेवण्यासाठी गाळा खाली करुन न घेण्याचे स्पष्ट केले.
शहरातील 80 टक्के दिव्यांग असलेले आदिनाथ केरूजी बोरुडे यांना पाटबंधारे विभागाने दोनशे चौरस फुटाची जागा अहमदनगर कार्यालयांतर्गत भाडेतत्त्वावर दिलेली आहे. त्या ठिकाणी बोरुडे झेरॉक्स मशीन चालवतात आणि त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. त्यांना एक दिव्यांग मुलगी असून, त्याशिवाय त्यांची बायको आणि कुटुंबातील इतर लोक त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. परंतु पाटबंधारे विभागाने 21 जुलै रोजी नोटीस काढून आदिनाथ बोरुडे यांनी सदरील जागा खाली करून द्यावी असा आदेश दिला. त्यामुळे कुटुंबामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होवून त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार होती.
शासन दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले बच्चू कडू यांची बोरुडे कुटुंबीयांनी भेट घेवून सदरचा प्रश्नावर लक्ष वेधले. त्यांनी तात्काळ हा प्रश्न मार्गी लावून दिला. दिव्यांगाच्या रोजगारासाठी सहकार्य करून पूर्ववत जागा कायम करुन दिल्याबद्दल फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी बच्चू कडू यांचा सत्कार केला. तर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी देखील सदर विषय सहानुभूतीपूर्वक विचार करुन सहकार्य केल्याबद्दल त्यांचे देखील बोरुडे परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे व पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांचे विशेष सहकार्य लाभले.
