मुलांनी घेतला शिक्षक होण्याचा व अध्यापन करण्याचा अनुभव
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस मध्ये आम्हालाही व्हायचंय शिक्षक! या संकल्पनेतून मुलांनीच भरवली एक दिवसीय शाळा. शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवणे त्याचबरोबर शिक्षक झाल्यावर कोण-कोणत्या जबाबदाऱ्या असतात? याचा अनुभव घेण्यासाठी मुलांनी एकत्र येऊन एक दिवसीय शाळेचे आयोजन केले होते.
मुलांनी शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे घंटा वाजवून शाळा भरवली. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना घेवून परिपाठाची सांगता गेली. प्रत्येक वर्गात दोन ते तीन शिक्षक लहान मुलांना विषयाप्रमाणे अध्यापन करत होते. अभ्यासाबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी, गाणी सांगून एक सुंदर अनुभव मुलांना दिला. काही शिक्षकांना वेगवेगळे अनुभव यातून मिळाले. मुलांचा चालू असलेला गोंधळ व त्यांना गप्प करण्यासाठी शिक्षकांची चाललेली धडपड यातून या विद्यार्थी शिक्षकांना लक्षात आले की, एक आदर्श शिक्षक होणे वाटते तितके सोपे नाही. तरीसुद्धा मुलांनी अतिशय सुंदर रित्या ह्या चिमुकल्या मुलांना शिकवले.

यावेळी लहान मुलांसाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या शेवटच्या तासाला मुलांना मैदानावर घेण्यात आले. एकावर एक थर रचून मुलींच्या हस्ते दहीहंडी फोडून जल्लोष करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गोविंदा आला रे… यासारख्या गाण्यावर नृत्य करुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे, प्रा.शाहरुख शेख, शबाना शेख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
