• Sun. Nov 2nd, 2025

श्रावणी शुक्रवारी शालेय विद्यार्थींनी घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

ByMirror

Sep 9, 2023

मंगलगौरीचे खेळ व विविध पारंपारिक गीतांवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण

जीवनात ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करा -पो.नि. ज्योती गडकरी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा विद्यालयात महाराष्ट्राच्या पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवित मुलींनी श्रावणी शुक्रवार उत्साहात साजरा केला. मंगलगौरीचे खेळ व विविध पारंपारिक गीतांवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. पालक, शिक्षक व विद्यार्थिनींनी या कार्यक्रमास टाळ्यांच्या कडकाडाटात दाद देवून कार्यक्रमाचा आनंद लुटला.


प्रारंभी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, डॉ. निलोफर धानोरकर उपस्थित होत्या.


पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी म्हणाल्या की, जीवनात ध्येय ठरवा. ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करा. स्वत:चे नाव व स्थान निर्माण करण्यासाठी कष्ट करावे लागतात. शालेय वयात स्वत:चे करिअर घडविण्याकडे लक्ष द्या. जीवनात चांगला आदर्श समोर ठेवा. स्वत:ला कमी न लेखता, करिअरसाठी आपल्या आवडीचा क्षेत्र निवडा. शालेय जीवनातील शिक्षण व संस्कार कुठेही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर शिक्षकांचा मान सन्मान ठेवण्याचा सल्ला देवून, ध्येयापुढे बिकट परिस्थिती आडवी येत नाही, आत्मविश्‍वास व इच्छाशक्तीने जीवनात पुढे जाण्याचे त्यांनी आवाहन केले.


डॉ. निलोफर धानोरकर म्हणाल्या की, अशा कार्यक्रमातून आपल्या संस्कृतीची मुलांमध्ये रुजवण होते. उत्कृष्ट प्रकारे मुलींनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. मुलींनी मानसिक व शारीरिक सशक्त होण्याची गरज आहे. यासाठी आहार व व्यायामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल विशेष जागृती होणे गरजेचे आहे. बारा वर्षापुढील मुलींमध्ये शारीरिक व मानसिक बदल झपाट्याने होत असतात. मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट नसून, समजून घेण्याची गरज आहे. यासाठी पालकांमध्ये देखील जागृती आवश्‍यक आहे. मुलींनी मासिक पाळीबद्दल भीती व संकोच न ठेवता त्याची परिपूर्ण माहिती घेण्याचे त्यांनी सांगितले.


प्राचार्य अजयकुमार बारगळ म्हणाले की, मुलींनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासह जपून नाव उज्वल करावे. अशी कोणतीही गोष्ट करू नये की, आपल्या आई-वडिलांचे मान खाली जाईल. सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या आई-वडिलांचे खरे मित्र बना. ध्येयप्राप्तीसाठी अपार मेहनत घेऊन त्यासाठी सातत्य ठेवा यश नक्की मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन इयत्ता 5 वी व 12 वीच्या विद्यार्थिनींनी केले होते. विद्यालयाच्या उपप्राचार्या सुवर्णा वैद्य यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, पालक शिक्षक संघ व निमंत्रक अध्यापिका संगीता पालवे यांनी परिश्रम घेतले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *