• Thu. Oct 30th, 2025

ऑनलाईनच्या कामावर बहिष्काराची हाक देवून आशांची जिल्हा परिषद समोर निदर्शने

ByMirror

Sep 4, 2023

दबावतंत्राने आशा वर्कर कडून फुकटात ऑनलाईनची कामे करुन घेतली जात असल्याचा आरोप

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑनलाईनच्या कामावर बहिष्काराची हाक देवून, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना आणि अहमदनगर जिल्हा आशा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद समोर सोमवारी (दि.4 सप्टेंबर) निदर्शने करण्यात आली. कोणतेही परिपत्रक नसताना, आशा वर्कर कडून फुकटात ऑनलाईनची करुन घेतली जाणारी कामे त्वरीत बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


या आंदोलनात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे, आशा वर्कर संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सुवर्णा थोरात, अर्चना आगरकर, भारती सूर्यवंशी, मीनाक्षी वारे, वर्षा घोंगडे, स्वाती पाठक, मीना म्हस्के, मंदा पाठक, आशा जाधव, अलका गोरे, मनीषा शिंदे, शोभा गायकवाड, सारिका डेंगळे, अनिता डहाळे, अश्‍विनी लोंढे, असिफा शेख, ललिता नरुण, मनिशा सरोदे, शकीला शेख, कविता लाहोर आदींसह आशा व गट प्रवर्तक महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.


आशा कर्मचारी यांची फिल्ड वर्कर म्हणून नेमणूक केलेली असतानाही त्यांना ऑनलाईनची कामे सांगितली जात आहे. महाराष्ट्रभर आशा वर्कर कडून ऑनलाईनची कामे करून घेतले जात आहे. वास्तविक आशा वर्करचे काम फिल्ड वर्क असतानाही कोरोना काळापासून अनेक कामांचा बोजा राज्य सरकारने त्यांच्यावर टाकून कमी पैशात अनेक योजना राबवून घेतल्या आहे. वास्तविक आशाची नेमणूक करताना शिक्षणाची फारशी अट नव्हती, स्वयंसेवीका म्हणूनच त्यांचे आरोग्य संदर्भात काम होते. ऑफलाईनची माहिती नंतर वाढू लागली आणि आता कसलेही तांत्रिक शिक्षणा नसताना त्यांच्याकडून ऑनलाइनची कामे करण्याचा सापटा लावण्यात आलेला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


महाराष्ट्रभर सर्व्हेक्षण करुन संघटनांच्या कृती समितीने पंधरा दिवसापूर्वी राज्य सरकारला या संदर्भात निवेदन दिलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने आशा व गट प्रवर्तक ऑनलाइन काम करणार नाही, अशी मागणी केलेली आहे. कोणत्याही प्रकारे अँड्रॉइड मोबाईलचे प्रशिक्षण न देता तसेच आशा वर्करकडे अँड्रॉइड फोन नसताना त्यांच्याकडून ऑनलाइन कामे करुन घेतली जात आहे.


अशा वर्कर यांना जे काम जमत नाही, तरी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. वेगवेगळे मेडिकल ऑफिसर आणि संबंधित आरोग्य कर्मचारी आशा वर्कर यांच्यावर दबाव वाढवत आहे. आशांना कोणत्याही प्रकारे ऑनलाईनचा मोबदला दिलेला नाही. याचा मोबदला मिळणार का नाही याची देखील शाश्‍वती नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जवळजवळ फुकट स्वरूपात कामे करून घेतली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ऑनलाईन कामावर बहिष्काराचा इशारा देणारे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी (जिल्हा परिषद) डॉ. नागरगोजे यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *