विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार
शिक्षक समाज घडवितात, तर कवी, साहित्यिक समाजाला दिशा देतात -आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक समाज घडवितात, तर कवी, साहित्यिक समाजाला दिशादर्शकाची भूमिका पार पाडतात. दोन्ही समाजातील महत्त्वाचे घटक असून, समाजाच्या उत्कर्षासाठी आपले योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन झालेला सन्मान कौतुकास्पद असून, पुरस्काराने काम करण्याची आनखी प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.

स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन व शिक्षकांसह विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आमदार लंके बोलत होते. नगर-कल्याण रोड, बायपास चौक (नेप्ती) येथील अमरज्योत लॉन मध्ये कवी संमेलन प्रा.डॉ. शंकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर पुरस्कार वितरण सोहळा शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी स्वागताध्यक्ष माधवराव लामखडे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशेवरे, कोतवाली पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक अश्विनी मोरे, कार्यक्रमाचे संयोजक पै. नाना डोंगरे, शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी, उद्योजक बाळासाहेब शहाणे, श्रीरामपूरचे उत्पादन शुल्क निरीक्षक गोपाल चांदेकर, वन क्षेत्रपाल हेमंत उबाळे, सिने अभिनेते आशिष सातपुते, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, ॲड. राजेंद्र वाबळे, मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, सरपंच लताबाई फलके, साहेबराव बोडखे, प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, काशीनाथ पळसकर, मिराबक्ष शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, रमेश वाघमारे, पै. भाऊसाहेब धावडे, डॉ. विजय जाधव, प्रा. बाबा जाधव, अतुल फलके, अजय ठाणगे, पिंटू जाधव आदी उपस्थित होते.

माधवराव लामखडे म्हणाले की, डोंगरे संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे सामाजिक कार्य सुरु आहे. समाजात निस्वार्थ भावनेने योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
काव्य संमेलनात नवोदित व ज्येष्ठ कवींनी कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवून, सामाजिक व्यथा देखील मांडल्या. एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कवितांना उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. निष्ठा सुपेकर व आभास सुपेकर या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. साहित्यिक रज्जाक शेख यांनी गजल मधून जीवनाचा अर्थ उलगडताना विविध प्रश्न मांडले. शर्मिला गोसावी यांनी महिला सशक्तीकरण व महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करणारी कविता सादर केली. कवी सुभाष सोनवणे, आनंदा साळवे व गीताराम नरवडे यांच्या कवितेने श्रोत्यांचे मन जिंकले. या कार्यक्रमात राज्याच्या विविध भागातून कवी सहभागी झाले होते.

प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी शिक्षक, कवी व साहित्यिक समाज घडविण्याचे कार्य करत असतात. शिक्षक दिनी त्यांचा सन्मान होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांनी समाजात वाढते सायबर क्राईम व फसवणुक रोखण्यासाठी मार्गदर्शन केले. तर सोशल मिडीयाच्या चुकीच्या वापरामुळे समाजात निर्माण होणारी तेढ व युवकांवर गुन्हे दाखल होत असताना खबरदारी घेण्याबाबत संवाद साधला. फुलचंद नागटिळक यांनी एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले. मुंबई येथील मिमिक्री कलाकार तथा अभिनेते आशिष सातपुते यांनी साईबाबांच्या वेशभुषेत सभागृहात प्रवेश करुन सर्वांचे लक्ष वेधले. तर राजकीय पुढारी, सिने अभिनेते यांचे हुबेहुब आवाज काढले. तर जादूचे विविध प्रयोग दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव मंदाताई डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सुरेश जाधव, संजय पुंड यांनी परिश्रम घेतले.
