18 टक्के पगारवाढ देण्याचा शालेय प्रशासनाचे लेखी आश्वासन
शिक्षक परिषद व शिक्षणाधिकारी यांच्या मध्यस्थीने निघाला मार्ग; शिक्षकांच्या आंदोलनाला यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमधील संपावर गेलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी स्कूल प्रशासनाच्या वतीने 18 टक्के पगारवाढ देण्याच्या लेखी आश्वासनाने सोमवारी (दि.4 सप्टेंबर) तीन दिवसांनी पुन्हा कामावर रुजू झाले. ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना पुरेसं मोबदला दिला जात नसल्याने व मागील पाच वर्षापासून विनंत्या, अर्ज करुन देखील शालेय प्रशासन दखल न घेतल्याने शिक्षक व शिक्षकेतर गुरुवारपासून संपावर गेले होते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षकांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर करुन संघटनेचे शिष्टमंडळ, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी केलेल्या मध्यस्थीने शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.

सोमवारी उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्या हस्ते आंदोलक शिक्षकांना शालेय प्रशासनाने दिलेल्या 18 टक्के पगारवाढच्या लेखी आश्वासनाची प्रत देण्यात आली. यावेळी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, शिक्षक माया मकासरे, गुरुशिल सोही, सुहास करंडे, भाऊसाहेब काळदाते, अंजली भिंगारदिवे, सांगुना टाकवले, अंजली भिंगारदिवे, गॅसपर बनसोडे, गोविंद कांडेकर, विजय पठारे, निर्मला पारखे, जोनिता गायकवाड, क्रांती पघडमल, रामप्यारी जाट, यामिनी आपटे, जया भाटिया, पौर्णिमा सोनवणे, शिल्पा शिंदे, श्याम लोंढे, स्नेहल खांत, कांचन धीवर, विशाखा फिलिप, सगुना ताकवले, शांती नेरो, रचना गायकवाड, मयूर टेमक, अर्चना लोखंडे आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमधील शिक्षकांनी पगारवाढसह इतर मागण्यांबाबत संप पुकारला होता. शाळेतील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. मागील पाच वर्षापासून पगारवाढची मागणी करणाऱ्या शिक्षकांचा उद्रेक संपातून बाहेर पडला. पगाराशिवाय शिक्षक कर्मचाऱ्यांना सर्व्हिस बुक, पे स्लीप, नियुक्तीचे कागदपत्र शिक्षकांना देण्याची मागणी देखील शिक्षकांनी केली होती.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी शुक्रवारी (दि.1 सप्टेंबर) शालेय प्रशासन व आंदोलक शिक्षकांशी संबंधित विषयांवर दोन तास चर्चा केली. या बैठकीच्या वाटाघाटीनंतर शालेय प्रशासनाने सदरचा निर्णय घेतला. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, याचा विचार करुन आंदोलक शिक्षकांनी या तडजोडीने आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. शालेय प्रशासनाने मनाचा मोठेपणा दाखवत घेतलेल्या निर्णयाचे आंदोलक शिक्षकांनी स्वागत करुन आभार मानले.

