माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिबिरास भेट देऊन रुग्णसेवेचे केले कौतुक
वेळेत उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो -डॉ. सतीश सोनवणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- वेळेत उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. प्राथमिक अवस्थेत कॅन्सरचे निदान होने आवश्यक असून, यासाठी वेळोवेळी तपासणी आवश्यक आहे. आजाराचे निदान होवून लवकर उपचार मिळण्यासाठी शिबिर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे प्रतिपादन कॅन्सर सर्जन डॉ. सतीश सोनवणे यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त प्रदीप देवीचंदजी नहार (प्रदीप इलेक्टीकल्स) परिवाराच्या वतीने आयोजित कॅन्सर तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी डॉ. सोनवणे बोलत होते. प्रारंभी प्रदीप नहार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिपीका नहार, प्रमिला संघवी, कुनाल नहार, पुष्कर नहार, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. आशिष भंडारी, मानकचंद कटारिया, बाबुशेठ लोढा, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, कॅन्सर फिजिशियन डॉ. दत्तात्रय अंदुरे, डॉ. मितेश कटारिया, डॉ. निखीता जैन, डॉ. भक्ती फळके, डॉ. मुकुंद उंडे, डॉ. रविंद्र मुथा आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. सोनवणे म्हणाले की, कॅन्सर हा असाध्य रोग अशी एक गैरसमजूत आहे. कॅन्सरचे योग्य वेळी निदान व उपचार कॅन्सर तज्ञांकडून केले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. यामुळे कॅन्सरला न घाबरता त्याला हरविण्यासाठी वेळीच उपचार करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, जीवनशैली बदलल्याने भारतात कॅन्सर झपाट्याने वाढत आहे. कॅन्सरबद्दल समाजात जागृती व प्राथमिक अवस्था ओळखण्यासाठी तपासणी आवश्यक आहे. दान-दात्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे महायज्ञ सुरु आहे. या सेवाकार्यात सर्वांनी झोकून दिल्याने समाजातील गरजूंना अल्पदरात सर्वोत्तम व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली आहे. या सेवा कार्यात नहार परिवाराचे देखील योगदान मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॅन्सरच्या सर्व थेरपी व उपचार हॉस्पिटलमध्ये अल्पदरात व महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदीप नहार म्हणाले की, व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करीत आहे. आरोग्य शिबिर घेऊन सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. सर्वसामान्यांच्या व्याधी मुक्तीसाठी सुरु असलेले या यज्ञात नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबीरात 72 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांवर विविध प्रकारच्या थेरपी व उपचार अल्पदरात केले जाणार आहे. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
या शिबिराच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलला भेट देवून, सुरु असलेल्या आरोग्य सेवेच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. तांबे म्हणाले की, हॉस्पिटलच्या माध्यमातून भव्य स्वरूपात शिबिर घेतले जात आहे. अनेक वर्षापासून सुरु असलेल्या रुग्णसेवेने जिल्ह्यातील तळागाळापर्यंत लाभ मिळत आहे. आनंदऋषीजी महाराजांच्या आशीर्वादाने व विचाराने उभे राहिलेल्या या रुग्णसेवेच्या कार्याने लाखो रुग्णांना नवजीवन मिळावे आहे. सर्व व्याधीवर एका छताखाली उपचार मिळत असल्याने सर्वसामान्यांना याचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.