प्रबोधन रॅलीने वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- वसतीगृहात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी मुला-मुलींनी समाजप्रबोधनवर रॅली काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. संगमनेर शहरातून आदिवासी समुदायांची रचना, संस्कृती, भाषा आणि परंपरा दर्शविणारी प्रबोधन रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीद्वारे बेटी बचाव बेटी पढाव, मुलगा-मुलगी एक समान, शेतकरी आत्महत्या, मतदार जागृती, महिला अत्याचारविरोधी पाऊल यावर विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविताना लेझीम पथकाच्या माध्यमातून नृत्य, आदिवासी नृत्य, आदिवासी क्रांतिकारकांची वेशभूषा करुन बिरसा मुंडा जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.
आदिवासी स्वतंत्रता सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सदर रॅलीची सुरुवात करण्यात आली. घुलेवाडी पासून ते बस स्टॅण्ड पर्यंत विविध उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. संगमनेर उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संदीप भांगरे यांनी रॅलीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आदिवासी मुलां-मुलींच्या वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

आदिवासी संस्कृतीचे दर्शन व समाजप्रबोधनपर रॅलीच्या यशस्वीतेसाठी संगमनेर शहर पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस अधिकारी, संगमनेर बस आगार प्रमुख यांचे सहकार्य लाभले. तर आदिवासी मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृह संगमनेर (नविन व जुने) येथील गृहपाल अनिता करडे, मिना आदमाने, राहुल शिरसाठ, दिलीप गुंजाळ, कनिष्ठ लिपिक सुहास दुधाट, अर्चना मोरे, उषा भांड, श्रीमती पांडे आदींसह सर्व कर्मचारीवृंदांनी परिश्रम घेतले.