उमेद फाऊंडेशनचा आदिवासी दिनाचा सामाजिक उपक्रम
आदिवासी कुटुंबातील मुलांच्या जीवनात शिक्षण घेण्याची उमेद निर्माण करण्याचा उपक्रम प्रेरणादायी -डॉ. नितीन रांधवण
अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत अनवाणी पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उमेद फाऊंडेशनच्या वतीने पादत्राणे व शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली. वनकुटे येथील काळूच्या ठाकरवाडी (ता. पारनेर) मध्ये फाऊंडेशनच्या वतीने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देवून आदिवासी दिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ. नितीन रांधवण, उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मळ, सहकारी सचिन साळवी, विजय लोंढे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास गागरे, ग्रामपंचायत सदस्य पोपट मेंगाळ, भाऊसाहेब साळवे, झुंबराबाई वारे, भाऊसाहेब गागरे, भिमराज गांगड, युवराज मधे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती मधे, गिरजू मधे, विजय पारधी, भाऊसाहेब पारधी, शिक्षक बन्सी घुणे, शौकत शेख, शिक्षिका संगिता गागरे, आशाबाई दुधवडे विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळूच्या ठाकरवाडी येथील अनेक आदिवासी कुटुंबातील मुले अनवाणी पायी शाळेत जात असल्याचे व त्यांना शैक्षणिक साहित्य नसल्याचे फाऊंडेशनने काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्व्हेतून समोर आले होते. या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याच्या उद्देशाने त्यांना पादत्राणे व सुलेखन वही, पेन, पेन्सिल, कंपासातील साहित्य व शालेय स्टेशनरीचे वाटप करण्यात आले. मुलांना पायात चप्पल व हातात नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता.
डॉ. नितीन रांधवण म्हणाले की, उमेद फाऊंडेशनने दुर्गम भागातील आदिवासी कुटुंबातील मुलांच्या जीवनात शिक्षण घेण्याची उमेद निर्माण केली आहे. त्यांचे सामाजिक कार्य प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे. काळूची ठाकरवाडी सारख्या दुर्गम भागात फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सर्व्हे करुन त्यांना दिलेल्या मदतीमुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे म्हणाले की, आदिवासी समाज हा विकासाच्या प्रवाहात येण्याची गरज आहे. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे व ते शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आली. तर त्यांची खरी गरज ओळखून मदत देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती मधे यांनी दुर्गम भागात अनवाणी पायी शाळेत जाणाऱ्या व शैक्षणिक साहित्य नसलेल्या विद्यार्थ्यांची गरज भागविल्याबद्दल उमेद फाऊंडेशनचे आभार मानले.
