• Sun. Nov 2nd, 2025

ईपीएस 95 पेन्शनर्सचे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आत्मक्लेश आंदोलन

ByMirror

Aug 9, 2023

उतार वयात सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन वाढ देण्याची मागणी

संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांच्या अटक सत्राचा निषेध

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ लवकरात लवकर होण्यासाठी व संघटनेची चळवळ अटक सत्र राबवून दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ क्रांती दिनी बुधवारी (दि.9 ऑगस्ट) ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती व ईपीएस 95 पेन्शनर कल्याणकारी संघटनेच्या वतीने (महाराष्ट्र राज्य) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जावून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.


तारकपूर बस स्थानक येथून मोर्चाला प्रारंभ होवून जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शनर्सचा मोर्चा धडकला. ईपीएस 95 पेन्शनर्सच्या प्रलंबीत मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करुन वेळकाढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली. तर उतारवयात जीवन चांगल्या पध्दतीने जगण्यासाठी पेन्शन वाढ करण्याची मागणी करण्यात आली. पश्‍चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अध्यक्ष संपतराब समिंदर, उपाध्यक्ष एस.के. सय्यद, शहराध्यक्ष संजय मुनोत, बापूराव बहिरट (नेवासा), राधाकृष्ण धुमाळ (श्रीरामपूर), आप्पा वाळके (श्रीगोंदा), अशोक देशमुख (संगमनेर), डौले पाटील (राहुरी), दशरथ पवार (शिर्डी), व्ही.व्ही. राजुरकर (जामखेड), युवराज तनपुरे (कर्जत), आशाताई शिंदे (महिला आघाडी अध्यक्षा), बी.एस. घोडके (नगर शहर), अंबादास बेरड (नगर तालुका), रघुनाथ आंबेडकर, बारहाते, सखाहरी भोसले, हौसाराव राजळे (पाथर्डी), वाघ, शिलाताई गिरी, आफरोज शेख, रंजना रहाटळ आदींसह जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांना अटक करुन पेन्शनर्सच्या आंदोलन दडपण्याचा झालेल्या प्रयत्नाच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. पेन्शन वाढ मिळण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली 4 ऑगस्ट रोजी शिष्टमंडळ श्रम मंत्री यांना भेटून चर्चा करण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळास कोणीही अधिकारी चर्चेसाठी आले नाही, मात्र पोलीस बळाचा वापर करुन त्यांना अटक करण्यात आली. लोकशाही मार्गाने होत असलेल्या मागणीचा व आंदोलन दडपण्याचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच केंद्रीय श्रम राज्य मंत्री रामेश्‍वर तेली यांनी संसदेत दिलेल्या असंवेदनशील उत्तराचाही यावेळी निषेध करण्यात आला. आंदोलनाप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकराच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.


पोखरकर यांनी ईपीएस 95 पेन्शनरचे प्रश्‍न न सुटल्यास पुढील निवडणुकीत सर्व पेन्शनर्स भाजप विरोधात मतदान करणार असल्याचा इशारा दिला. भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन, सदर मागण्या लवकर मान्य होण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार सुजय विखे याच्या बरोबर चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले.


ईपीएस 95 पेन्शनर्सना सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन वाढ करावी, पती-पत्नींना जीवन जगण्यासाठी किमान साडेसात हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन लागू करावी, पेन्शनर्स दांम्पत्यांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधानांना पाठविण्यासाठी त्याची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *