आठरे पाटील, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, आर्मी पब्लिक स्कूलची अंतिम स्पर्धेत धडक
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.4 ऑगस्ट) उपांत्य फेरीतील फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता. शालेय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या मधील विजेते ठरलेले आठरे पाटील, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, आर्मी पब्लिक स्कूलच्या संघांनी अंतिम स्पर्धेत धडक मारली आहे.

उपांत्य फेरीतील सर्वच फुटबॉलचे सामने चुरशीचे झाले. सकाळच्या सत्रात 12 वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूल विरुध्द ओएसिस इंग्लिश मिडीयम स्कूल मधील फुटबॉल सामन्यात आठरे पाटील स्कूलने 3-0 गोलने विजय मिळवला. या गटातील दुसरा सामना आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट यांच्यात झाला. दोन्ही संघांनी केलेल्या उत्कृष्ट खेळीने हा सामना शेवट पर्यंत 0-0 ने बरोबरित राहिला. पेनल्टीवर 3-2 गोलने ऑक्झिलियम कॉन्व्हेंटचा संघ विजयी झाला.
14 वर्ष वयोगटात आठरे पाटील स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल मधील सामन्यात आठरे पाटील स्कूलने दमदार खेळी करुन विक्रमी 18 गोलची नोंद केली. तर प्रतिस्पर्धी संघावर दणदणीत विजय मिळवला. समोरच्या संघाला गोलचे खातेही उघडता आले नाही.

दुपारच्या सत्रात 14 वर्ष वयोगटात तक्षीला स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूलचा फुटबॉल सामना शेवट पर्यंत बरोबरीत राहिला. पेनल्टीवर 3-2 गोलने आर्मी स्कूलने विजय मिळवला. 16 वर्ष वयोगटात झालेल्या आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल मधील सामन्यात 1-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूलने विजय पटकाविला. तर याच गटातील तक्षीला विरुध्द आठरे पाटील स्कूल मधील सामन्यात 3-2 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी ठरला. या फेरीतील विजेते संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे.