अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांची तर सदस्य पदी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके व प्राध्यापक डॉ. अरुण राख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी नुकतीच विद्यापीठातील विविध अभ्यास मंडळांची घोषणा केली. अभ्यास मंडळ हे त्या विषयांचा विद्यापीठीय अभ्यासक्रम ठरवण्याचे महत्त्वाचे काम करते. राज्यशास्त्राच्या अभ्यास मंडळावर नगर जिल्ह्यातून वरील तिघांची नियुक्ती झाली आहे. टेमकर हे पाथर्डी येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून 2010 पासून कार्यरत आहेत. यापूर्वी ते पुणे विद्यापीठाच्या क्रीडा मंडळात सदस्य होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणानुसार अभ्यास मंडळामध्ये आता त्या विषयाच्या संबंधित उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील तज्ञांचा समावेश केला जातो. या क्षेत्रातून लंके यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. लंके हे पत्रकारिता क्षेत्रात राजकीय व सामाजिक लेखन करत आहेत.
डॉ. राख हे पाथर्डी तालुक्यातील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात कार्यरत आहेत. हे अभ्यास मंडळ 31 ऑगस्ट 2027 पर्यंत कार्यरत राहणार आहे. या निवडीबद्दल राज्यशास्त्र विषयातील तज्ञ माजी प्राचार्य डॉ. टी एन कानवडे, प्राचार्य डॉ. विलास आवारी, निवृत्त प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे, डॉ. विलास नाबदे आदींनी वरील सदस्यांचे अभिनंदन केले आहे.