नेवासाच्या त्या पोलीस अधिकरीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला मोकळीक दिल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला त्या व्यक्तीवर व गुन्हा दाखल करुन न घेता मागासवर्गीय फिर्यादी महिलेस धमकाविणार्या नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात रिपाई महिला आघाडीच्या ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, विजय शिरसाठ, संतोष पाडळे, प्रिया वंजारे आदी सहभागी झाल्या होत्या.
8 जून रोजी नेवासा पोलीस स्टेशन मध्ये प्रिया वंजारे यांच्या फिर्यादीवरुन अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिया वंजारे या राजवाडा भानस हिवरा (ता. नेवासा) येथील रहिवासी आहे. त्यांना सतत जातीय हिनतेची वागणूक तसेच जातीय अत्याचार व मानसिक त्रास देण्याचा काम करण्यात आले. ज्यांच्या सांगण्यावरून हा अत्याचार करण्यात आला त्याला पोलीस प्रशासनाने पाठिशी घालून त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही.
गुन्हा दाखल करण्याच्या दिवशी फिर्यादी प्रिया वंजारे आपल्या कुटुंबासह नेवासा पोलीस स्टेशन येथे गेले असता पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल करून न घेता त्यांना उलट धमकाविले. व त्याच दिवशी त्यांचे पती किशोर वंजारे यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून घेण्यात आला. पोलीस निरीक्षक यांनी प्रिया वंजारे मागासवर्गीय असल्याने त्यांना गुन्हा दाखल करुन न घेता धमकाविले असल्याचे उपोषण कर्त्यांनी स्पष्ट केले आहे.