आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्य मंदिर ठरले -सुवालाल शिंगवी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये खर्चिक आरोग्य सुविधा घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे. येथे पैश्यापेक्षा सेवाभाव जपला जात आहे. या आरोग्य मंदिरात मनुष्यरुपी ईश्वराची सेवा घडत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुवालाल शिंगवी यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. श्रीमती कुसुमबाई चोपडा व स्व. विलास चोपडा यांच्या स्मरणार्थ वसंतलाल चुनीलाल चोपडा परिवाराच्यावतीने आयोजित मोफत दंत रोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शिंगवी बोलत होते. यावेळी संतोष बोथरा, मानकशेठ कटारिया, सुभाष मुनोत, प्रकाश छल्लाणी, बाबुशेठ लोढा, डॉ. आशिष भंडारी, दंतरोग तज्ञ डॉ. प्राची गांधी, डॉ. अर्पणा पवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत डेंटल विभाग सुरू झाला आहे. अत्यंत खर्चिक असलेली दंत रोगाची उपचार पद्धती सर्वसामान्यांना कमी खर्चामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने गरजूंना अद्यावत सुपर स्पेशलिटी आरोग्य सेवा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर समाजाचे ऋण फेडण्याची प्रेरणा सुवालालजी यांच्या कार्यातून मिळत असते.
स्नेहालयाच्या माध्यमातून त्यांनी मोठे कार्य उभे करुन वंचित घटकांना आधार दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या दंतरोग विभागात अत्यल्प दरात रुग्णांना दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहेत. एका सेटिंगद्वारे रूट कॅनल, दातांची कवळी बसविण्याची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. या विभागात अनुभवी तज्ञ डॉक्टर व ओरल सर्जन उपचारासाठी सज्ज असून, जबड्यांचे, दातांचे व हिरड्यांचे अद्यावत उपचार होणार आहेत. दर शनिवारी दंत रोग विभागाची ओपीडीची मोफत सेवा नागरिकांना मिळणार आहे.
या शिबिरात 160 रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. दंतरोग तज्ञ डॉ. प्राची गांधी व डॉ. अर्पणा पवार यांनी रुग्णांची दंत तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. शिबिरार्थींना सिरॅमिक कॅप व मेटलकॅप बसविणे, रुट कॅनल, दातांची कवळी बसविणे, दात साफ करणे, दातांमध्ये सिमेंट भरणे आदी उपचार अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.