दळवी परिवाराचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व.लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दळवी परिवाराच्या वतीने सात गरजू मुलींची शैक्षणिक पालत्व स्विकारण्यात आले.
स्व.लिलाबाई दळवी-क्षीरसागर यांनी अ.ए.सो.च्या वांबोरी (ता. राहुरी) येथील महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 35 वर्षे सेवा केली. त्यांनी सेवा काळातही अनेक गरजू मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करुन त्यांना मदत केली. त्यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा बँकेचे माजी टीडीओ बाबूराव दळवी यांनी हा उपक्रम राबविला.
दळवीच्या परिवाराच्या वतीने शैक्षणिक पालकत्व घेतलेल्या सातही मुलींना चालू शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक मदत देण्यात आली. तर त्यांचे परीक्षा शुल्कही भरण्याचे जाहीर करण्यात आले. शाळेत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस.एल. कुलकर्णी व प्रमुख पाहुणे म्हणून को-चेअरमन हेमंत मुथा उपस्थित होते.
माजी अध्यापक शंकर शेवाळे यांनी स्व.लिलाबाई दळवी-क्षीरसागर शाळेत कार्यरत असताना यांच्या शैक्षणिक योगदानाची माहिती दिली. एस.एल. कुलकर्णी म्हणाले की, दळवी मॅडम शाळेत कार्यरत असताना नेहमीच गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य केले. हाच वारसा चालविणारे त्यांच्या कुटुंबीयांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अॅड. सुभाष पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
बाबूराव दळवी यांनी गरजू घटकातील शालेय विद्यार्थ्यांना नेहमीच दळवी परिवाराच्या वतीने आर्थिक आधार देण्याचे कार्य केले जाणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी उपमुख्यद्यापक भालसिंग, पर्यवेक्षक भांड, पंचायत समितीचे माजी सदस्य एकनाथराव ढवळे, आदींसह शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना तोडमल यांनी केले. गरजू मुलींच्या शैक्षणिक पालकत्व उपक्रमाचे वांबोरी परिसरातून कौतुक होत आहे.