लंगर सेवेच्या माणुसकीच्या कार्याची जगाच्या पाठीवर दखल घेण्यात आली -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- लंगर सेवेच्या माणुसकीच्या कार्याची जगाच्या पाठीवर दखल घेण्यात आली. कोपनहेगन, डेन्मार्क येथून डब्ल्यू.ए.एफ.ए. संस्थेने या कार्याची दखल घेऊन जागतिक स्तरावर समाज कार्यासाठी दिल्या जाणार्या पुरस्काराच्या मानांकन यादीत लंगर सेवेचे कार्य पोहचले. कोरोनामध्ये लंगर सेवेने दातृत्व व माणुसकीचा भावना जागवली असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व कोरोनानंतर देखील अविरतपणे गरजूंना जेवण पुरविणार्या तारकपूर येथील घर घर लंगर सेवेच्या अन्न छत्रालयात आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जेवणाच्या पाकिटसह केकचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, अजिंक्य बोरकर, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, गुलशन कंत्रोड, अभिमन्यू नय्यर, जय रंगलानी, मनोज मदान, सुनिल छाजेड, प्रशांत मुनोत, जतीन आहुजा, अभिमन्यू नय्यर, राजा नारंग, बलजितसिंह बिलरा, सतीश गंभीर, अर्जुन मदान, अंकुश चत्तर, राजेश कुकरेजा, कैलाश नवलानी, धनंजय भंडारे, जस्मितसिंह वधवा, ज्ञानशेठ नवलानी, दिपक नवलानी, बाबुशेठ नवलानी, भारत नवलानी, मनू कुकरेजा आदी उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, अनेक गरजूंना या लंगर सेवेने आधार दिले. अन्नदान पर्यंत मर्यादित न राहता जनावरांना चारा तर गरजू विद्यार्थ्यांना ई लर्निंगसाठी मोबाईल व रुग्णांना ऑक्सिजन देखील उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी जतीन आहुजा यांनी आमदार जगताप यांचे स्वागत करुन सत्कार केला. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी लंगर सेवेच्या माध्यमातून कोरोना काळात अन्नाचे पाकिट गरजूंना पुरविण्याचे कार्य सुरु होते. लाखो गरजूंना या सेवेचा लाभ घेतला. कोरोनानंतर तारकपूरला अन्न छत्र सुरु करण्यात आले असून, तारकपूर बस स्टॅण्ड, जिल्हा रुग्णालय व इतर विविध खासगी हॉस्पिटल या भागात असल्याने अनेकांना या अन्नछत्राचा लाभ मिळत असल्याचे स्पष्ट केले.
जनक आहुजा म्हणाले की, लंगर सेवेने समाज कार्य करणारी सर्व व्यक्ती जोडले गेले आहेत. दातृत्व भावनेतून उभी राहिलेली लंगर सेवेने सर्वांच्या मनात घर केले आहे. या कार्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे नेहमीच पाठबळ मिळाले. प्रत्येक सामाजिक कार्याचे ते साक्षीदार असून, त्यांनी विविध कठिण प्रसंगी सर्वांना धीर देण्याचे व पाठबळ देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
