वाकळे यांचे रायगड जनसंपर्क कार्यालय उपनगराच्या विकासाची नांदी ठरणार -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवताना रायगडाचा इतिहास विसरुन चालणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कुमारसिंह वाकळे यांनी रायगड नावाने सुरु केलेले जनसंपर्क कार्यालय उपनगराच्या विकासाची नांदी ठरणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम या वास्तूच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
बोल्हेगाव येथे नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी सुरु केलेल्या रायगड या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्व. विशालभाऊ वाकळे पाटील मित्र मंडळ, बोल्हेगाव, नागापूर परिसरातील नागरिक, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, बोल्हेगाव उपनगरात विकासाचे व्हिजन घेऊन कुमार वाकळे यांनी कार्य केले. प्रभागाचा कायापालट झाला. त्यांच्या कामामुळे मोठा जनसमुदाय त्यांना जोडला गेला आहे. या परिसरातील प्रश्न मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी हक्काचे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध झाले आहे. जनसामान्यांचे कार्यालय म्हणून या रायगडाची प्रचिती सर्वांना येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संपत बारस्कर म्हणाले की, बोल्हेगाव परिसरात अनेक विकासात्मक कामे मार्गी लावताना कुमारभाऊ यांना आमदार संग्राम जगताप यांची मोठी साथ मिळाली. आमदार जगताप यांच्याकडून विकासाचे व्हिजन मिळाल्याने नगरसेवकांनी देखील प्रभागाचा कायापालट केला. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना ते पुढे आणि कार्यकर्ते मागे अन्यथा इतर राजकीय पक्षात उलटे चित्र असते. प्रभागातील जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून कुमारभाऊंचे कार्य पुढे आले आहे. हेच कार्य सातत्याने सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुमारसिंह वाकळे म्हणाले की, पायवाट असलेल्या परिसरात रस्ते निर्माण झाले, गटार नसलेल्या ठिकाणी ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झाले. तर पाण्यासाठी भटकंती करणार्या नागरिकांच्या दारात नळाद्वारे पाणी आले. हे सर्वांनी टाकलेल्या विश्वासामुळे कार्य सिध्दीस गेले. यासाठी आमदार संग्राम जगताप यांची मोठी साथ लाभली. त्यांनी सर्वात जास्त निधी उपलब्ध करुन दिल्याचे ही विकास कामे मार्गी लावता आली. विकास हाच आधारभूत केंद्र डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्यात आले. प्रभागातील उर्वरीत विकास कामे देखील सोडविण्याच्या दृष्टीने कार्य सुरु असून, नागरिकांना रायगड हे जनसंपर्क कार्यालयात हक्काने कामे घेऊन येता येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व नागरिकांना फेटे बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीत रायगड जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण करण्यात आला. यावेळी कुमारभाऊ वाकळे यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांची चित्रफित नागरिकांना स्क्रिनवर दाखविण्यात आली. यावेळी वाकळे यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.