प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
खर्या दिव्यांगावर अन्याय होऊ देणार नाही -आशिष येरेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने दिव्यांग कर्मचारीवर होणार्या त्रासा संदर्भात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. तर ऑनलाइन प्रमाणपत्र, युडी आयडी प्रमाणपत्र असलेल्या व ज्या कर्मचार्यांची वारंवार पडताळणी झाली आहे. अशा कर्मचार्यांना कोणत्याही संघटनांच्या सांगण्यावरून चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
दिव्यांग कर्मचारीसाठी नेहमीच असलेला सकारात्मक प्रतिसादाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, शहराध्यक्ष संदेश रपारिया, जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे, जिल्हा सचिव हमिद शेख आदी उपस्थित होते.
काही व्यक्तींच्या चूकीमुळे सर्वच दिव्यांगांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा पडताळणी झालेल्या दिव्यांगांची काही संघटनांच्या सांगण्यावरुन पुन्हा-पुन्हा तपासणी करणे हे दिव्यांगांना त्रास देण्यासारखे आहे. चौकशीच्या नावाखाली दिव्यांगांना वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती सेना व प्रहार दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अॅड. लक्ष्मण पोकळे यांनी कोणत्याही दिव्यांग कर्मचार्यावर शंका असेल तर त्यांचे नाव व पुरावा आणि त्यासाठी लागणारा खर्च त्या संस्थेनी करण्याचे म्हंटले आहे. ती व्यक्ती बोगस नसेल तर तक्रारदारावर अवमान याचिका दाखल करण्यासाठीही संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कोणत्याही खर्या दिव्यांगावर अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या सोबत प्रशासन सदैव राहणार असल्याचे शिष्टमंडळास आश्वासित केले.