अहमद निजामशहाची दूरदृष्टी व पराक्रम अभिमानास्पद -सिध्दाराम सालीमठ
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिनानिमित्त रविवारी (28 मे) सकाळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबर स्थळी भेट देऊन चादर अर्पण केली. यावेळी नगर-नेवासा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचे अधीक्षक डॉ. प्रा. संतोष यादव, इतिहासाचे अभ्यासक भूषण देशमुख आदींसह इतिहासप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले की, शहराचे संस्थापक अहमद निजामशहाची दूरदृष्टी व पराक्रम अभिमान वाटावा असे आहे. 533 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे त्याने शहराची स्थापना केली व शहराला मोठे वैभव प्राप्त करून दिले, अभ्यासाच्या दृष्टीने त्याचे संशोधन करण्यास मोठी संधी आहे. शहराच्या वैभवशाली इतिहासाची परंपरा यापुढेही कायम ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी नगरकरांना शहर स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांनी अहमद निजामशहा यांच्या कर्तुत्व व वैभव संपन्न असलेला इतिहास सर्वांसमोर मांडला. तर शहराची ऐतिहासिक माहिती दिली. बागरोजासाठी प्रलंबीत असलेला रस्त्याचा प्रश्न जिल्हाधिकारी सालीमठ यांच्यापुढे इतिहासप्रेमी मंडळींनी मांडला. याबाबत माहिती घेऊन पाठपुरावा करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेरिटेज वॉकसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी जात-पात के बंधन तोडो… भारत जोडो.. भारत जोडो! च्या घोषणा दिल्या.