• Fri. Sep 19th, 2025

काव्य संमेलनाच्या कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन

ByMirror

May 27, 2023

ग्रामीण जीवनातील वेदनांचा हुंकार भरलेल्या होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन

सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काव्य संमेलन उत्साहात पार पडले. कवितेतून सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवून सामाजिक व्यथा देखील मांडण्यात आल्या. तर आईच्या वात्सल्यावर सादरीकरण झालेल्या कवितेने ह्रदयाचा ठाव घेतला. एकापेक्षा एक सरस सादरीकरण झालेल्या कवितांना उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.


छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, कवी आनंदा साळवे, साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, माजी प्राचार्य सुभान खैरे, लेखक गिताराम नरवडे, रामदास फुले, सुनिलकुमार धस, सारिका चांदेकर आदींसह कवी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


नगर-कल्याण रोड वरील अमरज्योत लॉन मध्ये झालेल्या कवी संमेलनात आभाळाच्या देवा ऐक आर्क भूपाळी…., कधी कधी ग माय उपाशी पोटी निजायची… आदी विविध कविता यावेळी रंगल्या होत्या. या कार्यक्रमात विक्रम औचिते, जयश्री सोनवणे, देवीदास बुधवंत, विलास हाडोळे, बाळासाहेब मुंतोडे, दुर्गा कवडे या कवींनी सहभाग नोंदवला. तर बाल कवींनी देखील आपल्या कवितांचे सादरीकरण केले. तसेच यावेळी शिवकालीन मर्दानी खेळाचे धाडसी प्रात्यक्षिक रंगले होते. प्रशिक्षक सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युवक-युवतींनी लाठी-काठी, तलवार, दानपट्टाचे थरारक प्रात्यक्षिके सादर केली.


ग्रामीण जीवनातील वेदनांचा हुंकार भरलेल्या गिताराम नरवडे लिखित होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तर विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणार्‍यांना स्वराज्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना उत्कृष्ट पोलीस अधिकारी, उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर व सारिका चांदेकर यांना वृक्ष मित्र तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेहरु युवा केंद्राच्या मिशन लाईफ उपक्रमातंर्गत पाणी वाचवा, पाणी जिरवा, वृक्षरोपण व संवर्धन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.


प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍यांना फक्त पाठीवरती शाबासकीची थाप आवश्यक असते. अनेक महापुरुषांनी जात-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले. या महापुरुषांच्या प्रेरणेने सामाजिक कार्य करणार्‍यांना पुरस्काराने सन्मान करुन प्रोत्साहन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


लेखक गिताराम नरवडे यांनी होरपळ पुस्तकातील सर्व घटना जीवनाशी निगडित आहे. ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्‍न मांडून जे जगलो, ते पुस्तकात मांडण्यात आले आहे. सामाजिक वास्तववादाला जागरुकतेचा आधार देऊन ग्रामीण जीवनवास्तवाचा शोध या पुस्तकातून घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
सुभाष सोनवणे म्हणाले की, सामाजिक चळवळीला दिशा देण्याचे काम डोंगरे संस्था करीत आहे. तर सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, खाजगीकरण व उदारीकरणाने बहुजन समाजाची होरपळ झाली. मालक नफा कमवून श्रमिकांचे शोषण करत आहे. तर जागतिकीकरणाने आपल्याला घामाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


उत्पादन शुल्कचे निरीक्षक गोपाल चांदेकर यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून निरोगी आरोग्यासाठी नागरिकांना ऑनलाइन व्यायामाचे धडे व दुर्मिळ वृक्ष मोफत वाटपाचा उपक्रम सुरु आहे. कुटुंबाच्या वतीने आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पुरस्कार रूपाने कौतुकाची थाप मिळाल्यास हिरारीने काम करण्याची प्रेरणा मिळते. तर पुरस्काराने नेहमीच जबाबदारी वाढत असल्याचे सांगितले. समारोपप्रसंगी आमदार निलेश लंके यांनी कार्यक्रमास भेट देऊन पुरस्कार्थींना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, अनिल डोंगरे, अण्णा जाधव, अनिल डोंगरे, पिंटू जाधव, अतुल फलके, मयुर काळे, नामदेव भुसारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *