लाखो भाविकांची उपस्थिती, रक्तदान-अवयवदानात विक्रमी सहभाग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सतलोक आश्रमात जगद्गुरु संत रामपालजी महाराज यांच्या पवित्र सानिध्यामध्ये 512 व्या दिव्य धर्म यज्ञ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाभंडारा, रक्तदान शिबिर व अवयवदान संकल्प आणि धार्मिक प्रदर्शनांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तीभावाने न्हाऊन निघाला.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश यांसह देशभरातून लाखो अनुयायी उपस्थित झाले होते. भक्तांनी एकसंधतेने “सर्वधर्मसमभाव आणि मानवतेचा संदेश” जगासमोर मांडत संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीचं प्रत्यक्ष दर्शन घडवले. या महायज्ञाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात तब्बल 651 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा आदर्श उभा केला. तर 351 भक्तांनी अवयवदानासाठी संमतीपत्र भरून दिले. संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांनी समाजात “हुंडा बंदी, जातीभेद मिटवा आणि सर्व धर्मांना समानतेने वागवा” हा संदेश दिला. या कार्यक्रमात विविध धर्मग्रंथांचे प्रदर्शन, सामाजिक सुधारणा विषयक माहितीपर पुस्तके, मानवतेच्या कुंडलिनी जागरणावरील शिबिरे आणि अन्नदानाचा महाभंडारा आयोजित करण्यात आला होता. ढवळपुरीच्या या पवित्र भूमीवर संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीचा संदेश देऊन भक्तांनी एकच जयघोष केला.
