• Tue. Jul 22nd, 2025

अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची 50 टक्के सवलत पुन्हा सुरु करावी

ByMirror

Dec 9, 2023

मराठी पत्रकार परिषदेची मागणी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना दिले निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांनी दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, बंडू पवार, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख, महेंद्र (भैय्या) गंधे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या या प्रश्‍नाची माहिती घेऊन तो मार्गी लावू, असे आश्‍वासन डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.


मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवेदन देण्यात आले. भारतीय रेल्वे विभागाकडून पत्रकारांना रेल्वे प्रवासात तिकिटामध्ये 50 टक्के सवलत दिली जात होती. देशभरातील राज्य शासनाने अधिस्विकृती पत्रिका दिलेले पत्रकार या योजनेसाठी पात्र होते.

प्रवासात सवलत असल्याने वार्ता संकलनासाठी, विविध राजकीय कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सवलतीचा मोठा फायदा पत्रकारांना होत होता. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धी देण्यासाठी, विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सोयीचे होते. सन 2020 पासून रेल्वे विभागाने पत्रकारांची ही सवलत बंद केली आहे. त्यामुळे देशभरातील पत्रकारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवासात सवलत नसल्याने अनेक पत्रकार प्रवास करत नाहीत. परिणामी सरकारी योजना, शासकीय कार्यक्रमाला जाण्यास अडचणी येत आहेत. सर्व बाबींचा विचार करून देशभरातील राज्य शासनाने अधिस्विकृती पत्रिका दिलेल्या पत्रकारांना पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात सवलत देण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.


डॉ.सुजय विखे पाटील यांनीही पत्रकाराच्या या प्रश्‍नाची दखल घेतली. तसेच या प्रश्‍नाबाबत अधिक माहिती घेऊन त्यातून मार्ग कसा काढता येईल, यादृष्टिनं प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *