जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी
जनसामान्यांना न्याय, हक्क व अधिकार माहिती होण्यासाठीचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस जनजागृती उपक्रमाने साजरा व्हावा व कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणीकरीता शासनस्तरावरुन सर्वतोपरी उपाययोजना करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सहसचिव फिरोज शेख यांनी प्रशासनाकडे केली आहे.
28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या आधीच आदेश दिले आहेत. परंतु या आदेशाची अंमलबजावणी फक्त कागदावरच होताना दिसत आहे. माहिती अधिकार अधिनियम हा कायदा देशभरात सन 2005 पासुन लागू करण्यात आला. शासनाने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. या कायद्याचा मुळ मसुदा न्यायमुर्ती पी. बी. सावंत यांनी तयार केलेला आहे. 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
या दिवशी माहिती अधिकार अधिनियम या कायदयातील तरतुदी, कार्यपध्दती, विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यन्त पोहोचविण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची मागणी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने फिरोज शेख यांनी केली आहे. या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस अधिक्षक तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले आहे.
या मागणीपत्रात शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारीत प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित करावी, यासाठी अशासकिय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा. हा उपक्रम व्यापक पातळीवर राबवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असून, जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करावा. जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकाराबाबत माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत असून, माहिती अधिकार दिन जनजागृतीने प्रभावीपणे साजरा करण्याचे म्हंटले आहे.
