• Mon. Jan 13th, 2025

28 व 29 मार्च संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन उतरणार

ByMirror

Mar 22, 2022

संपामुळे बँकांचे कामकाज पूर्णतः होणार ठप्प

अहमदनगर (प्रतिनिधी)- 28 व 29 मार्च रोजीच्या कामगारांच्या देशव्यापी संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन सहभागी होणार आहे. बँकातिल एआयबीईए, एआयबीओए, बेफी या तीन संघटना मिळून पाच लाखांहून अधिक बँक कर्मचारी तसेच अधिकारी या संपात सहभागी होत असून, अहमदनगरच्या सर्व बँक कर्मचारी व अधिकारी यांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी केले आहे. या संपात कामगारांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन कोड बील रद्द करण्याच्या मागणीसह बँक खासगीकरणाला विरोध करण्यात येणार आहे.
देशात होत असलेल्या कामगारांच्या दोन दिवसीय संपात भारतीय मजदूर संघ सोडता इतर सर्व मध्यवर्ती कामगार संघटना, कर्मचारी संघटना, उद्योग निहाय कामगार तसेच कर्मचारी संघटना, बँक, विमा उद्योगातील कर्मचारी तसेच काही अधिकारी संघटना, असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार तसेच कर्मचारी मिळून 9 कोटींवर कामगार, कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. हा संप प्रामुख्याने नवीन कामगार कायद्याच्या विरोधात आहे. तसेच सरकार सरसकट सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे जे खासगीकरण करू पाहत आहे त्याच्या विरोधात आहे. याशिवाय सरकार, सार्वजनिक तसेच खाजगी उद्योगातून कायम स्वरूपी रिकाम्या जागा न भरता सरसकट आऊटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धतीचा अवलंब करून कामगारांचे जे शोषण करत आहे त्याच्या विरोधात आहे. याशिवाय नवीन कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हा आग्रह देखील संघटनांच्या वतीने धरण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या संपात बँक संघटनांच्या वतीने प्रामुख्याने बँक खासगीकरणाला विरोध दर्शविला जाणार आहे. सरकार तर्फे लोकसभेच्या या अधिवेशनात कुठल्याहि क्षणी बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडण्यात येऊ शकते. हे लक्षात घेता बँक कर्मचारी संघटना बँक खाजगीकरण विरोधातील आपले आंदोलन अधीक तीव्र करण्याच्या पवित्र्यात आहेत. या संपात बहुसंख्य बँक कर्मचारी आणि बँक अधिकार्‍यांची दोन नंबरची मोठी संघटना एआयबीओए सहभागी होत असल्यामुळे स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक सोडता इतर सर्व बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प होणार आहे. या संपात जुन्या जमान्यातील खाजगी बँका, कांही विदेशी बँका, ग्रामीण बँक तसेच सहकारी बँकेतील कर्मचारी देखील या संपात सहभागी होणार आहे.
संपाचे वैशिष्टये म्हणजे बँक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाची कुठलीच आर्थिक मागणी अंतर्भूत नसून, देशातील सामान्य माणसाची शंभर लाख कोटी रुपयापेक्षा जास्तची बचत सुरक्षित राहावी, यासाठी बँकिंग सार्वजनिक क्षेत्रात राहावे म्हणून बँक कर्मचारीवर्ग हा संप करत असल्याचे म्हंटले आहे. हे लक्षात घेऊन बँक ग्राहक तसेच जनतेने या संपाला पाठिंबा द्यावा असे आवाहन बँक कर्मचारी तसेच अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *