राज्य कार्यकारणीच्या बैठकीमध्ये निर्णय
जुनी पेन्शनसह 11 मागण्यांचा समावेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या 14 मार्च रोजीच्या राज्यव्यापी बेमुदत संपात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद समन्वय समितीच्या पुणे येथील दोन दिवसीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह शिक्षक, शिक्षकेतरांच्या कॅशलेस मेडिकलेम, आश्वासित प्रगती योजना, अशा अन्य 11 मागण्याचा यामध्ये समावेश करण्यात आला असून, या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यासाठी शिक्षक परिषद प्रयत्नशील आहे. या बैठकीसाठी शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, कार्यवाह बोन्नकीले, कोषाध्यक्ष सोमनाथ सूर्यवंशी, माजी आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी कार्यकारणीला संबोधित करून मार्गदर्शन केले. तर मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे, गणेश नाकती, वैशाली नाडकर्णी, उल्हास वडोदकर यांनी सक्रिय सहभाग घेऊन विविध सूचना मांडल्या.
नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांना अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून जुनी पेंन्शन योजना लागू करावी, शिक्षकांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी, 10-20 20 वर्ष सेवेची आश्वासित प्रगति योजना शिक्षकांनाही लागू करावी, वर्ग 6 ते 8 शिकणार्या सर्व प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणी मान्य करावी, कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची पदे एकूण विद्यार्थी संख्येवर मंजूर करुन पूर्वीप्रमाणेच पुनर्स्थापित करावी, केंद्र शासनाच्या धर्तीवर महिला शिक्षकांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा व पुरुष शिक्षकांना पितृत्व रजा मिळावी तसेच अस्तित्वात असलेल्या शासन आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, विनाअनुदानित काळातील सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीकरिता ग्राह्य धरावी, बंद केलेले समुपदेशक प्रशिक्षण वर्ग पुन्हा सुरु करून प्रत्येक शाळेत समुपदेशक नेमण्यात यावेत, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांचे सर्व प्रश्न सोडवावेत, अनुदानित शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन मुंबईतील अनुदानित शाळांमध्ये व्हावे, पूर्व माध्यमिक तांत्रिक व सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन महिन्याच्या एक तारखेला देण्यासंबंधी शासनाचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या मागणीसह शिक्षक परिषद या संपात सहभागी होत आहे. राज्यासह जिल्ह्यात हा संप यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.