अन्यथा भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाचे उपोषणाचा इशारा
गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटून देखील आरोपी व तो सामाजिक कार्यकर्ता मोकाटच
अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल होऊन सुध्दा अटक होत नसल्याने भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हॉटेलची तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी देऊन जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याप्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनला सरपंच अण्णा शाहू जगधने, आजिनाथ अण्णा जगधने, रवी रामनाथ जगधने, राजू रामनाथ जगधने, काकासाहेब शाहू जगधने, एकनाथ दगडू जगधने, सोमनाथ रामनाथ जगधने व सामाजिक कार्यकर्ते किसन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पंधरा दिवस उलटून देखील पोलीसांनी संबंधित आरोपीला अटक केलेली नाही. यामधील आरोपीने
शेवगाव पोलीस प्रशासनावर बदनामीकारक वक्तव्य, चिथावणीखोर भाषण व भाजपचे आमदार आणि मंत्र्यांविरुद्ध अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे. तरीदेखील त्यांना पाठिशी घातले जात असल्याचे फिर्यादी तथा भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी निवेदनात म्हंटले आहे.
संबंधित आरोपींना त्वरीत अटक न झाल्यास 20 सप्टेंबर रोजी भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
