तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत पटकाविले विजेतेपद
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये झालेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या हिंगणगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुले व मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. वय वर्षे 14 व 17 वयोगटातील मुले व मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व नगर तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हॉलीबॉल स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलच्या मुले व मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन शेवट पर्यंत आपला दबदबा कायम राखला.
संघातील सर्व खेळाडूंचे सत्कार करुन पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबा पाटील सोनवणे, माजी उपसरपंच श्यामराव कांडेकर, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, हिंगणगाव विद्यालयाचे क्रीडा शिक्षक वैभव शिंदे, संतोष रोहोकले, प्रताप भापकर, सविता कार्ले, हसन शेख, शादाब मोमीन, भगवंत रेंगडे, रवी हाडबे आदी उपस्थित होते. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक वैभव शिंदे व संतोष रोहकले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संघातील खेळाडूंचे न्यू इंग्लिश स्कूलचे सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावाच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

