बलात्कार व खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा होता आरोप
नगर तालुक्यातील घटना
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन पीडितेच्या बलात्कार व खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा आरोपातून आरोपीची विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर गुन्हयामध्ये आरोपी वर पीडितेला लाकडी दांडक्याने मारले त्यामुळे पीडितेला जखमी अवस्थेत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी पीडित हि गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पीडिता हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारकामी पुणे येथील ससून हॉस्पिटलला हलवण्यात आले. तेथे तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
त्यापूर्वी तिने एका बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर आरोपीने पीडिता स्त्री व स्वतःचा पळशी येथील रस्तावर अपघात झाला व त्यातून तिचा मृत्यू झाला असा बनाव तयार केला बाबतचा आरोप पोलीसांनी केला. तदनंतर पोलिसांनी त्याअनुषंगाने घटनेचा सखोल तपास करून आरोपीने खून व बलात्कार करून अपघाताचा बनाव रचल्याचा निष्कर्षावर पोहचून आरोपी विरुद्ध विशेष सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
सदर खटल्यामधे सरकार पक्षाने साक्षीदारांचे साक्ष नोंदवले. त्यानुसार आरोपी तर्फे अॅड. परिमल कि. फळे यांनी सदर साक्षीदारांचे उलटतपास घेतले. तर हा खून नसून अपघातचं आहे असा बचाव आरोपीतर्फे केला. अॅड. परिमल कि. फळे यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलटतपास व युक्तिवाद विशेष सत्र न्यायाधीश एम.एच. मोरे यांनी ग्राहय धरुन आरोपी यास निर्दोष मुक्त करण्याचा निकाल पारित केला. सदर खटल्याकामी अॅड. परिमल कि. फळे यांना अॅड. सागर गायकवाड, अॅड. अभिनव पालवे यांनी सहाय्य केले.