• Wed. Oct 29th, 2025

स्त्रीदास्य आणि जातीदास्य संपविण्यासाठी राष्ट्रीय गीताभारत जातदाहिनी लढा घोषित

ByMirror

Mar 9, 2023

महिला दिनानिमित्त इंडिया अगेन्स्ट तमस चेतना संघटनेची घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील स्त्रीदास्य आणि जातीदास्याचा नायनाट करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट तमस चेतना संघटनेच्या वतीने महिला दिनानिमित्त राष्ट्रीय गीताभारत जातदाहिनी लढा घोषित करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. प्रत्येक माणसामध्ये असणार्‍या तमस् चेतना संपवून उन्नत चेतना जागरुक करण्याचा प्रयत्न या चळवळीतून करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे.


भारतात शेकडो वर्षे जातीव्यवस्था टिकून आहे. जातीअंतासाठी इतरांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे या गोष्टीला यश आलेले नाही. जातींचे अस्तित्व हे माणसाच्या मनातील कायमच्या धारणेमध्ये असते. आपली जात श्रेष्ठ व इतरांची जात कनिष्ठ आहे, अशी त्यामागची भूमिका असते. त्यामुळे गीताभारताच्या तंत्रातून प्रत्येकाला आपल्या अंतकरणातील जात कायमची संपवता येते आणि उन्नत चेतनेने तमस चेतनेवर मात करता येते. ही बाब गीताभारताने अडीच हजार वर्षापुर्वी संपूर्ण मानव जातीला स्पष्ट केली. परंतु भारतामध्ये गीताभारताला एक धार्मिक पोथी करुन पुजा आणि कर्मकांडामध्ये अडकविण्यात आली आहे. गीताभारतातील क्रांतीकारक मानसशास्त्राने तमस व जातीयवादी प्रवृत्तींचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नसल्याची संघटनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.


जाती व्यवस्थेमध्ये असणारे श्रेष्ठ, कनिष्ठ म्हणजेचे न्यूनगंड आणि या बाबी महिलांना कनिष्ठ आणि दुय्यम दर्जाच्या ठरविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत. सर्व महिलांनी गीताभारताच्या मदतीने उन्नत चेतना प्राप्त केली, तर कोणत्याही महिलेला न्यूनगंडाची बाधा होणार नाही आणि कोणत्याही स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जाणार नाही. महिलांचे सबलीकरण ही बाब पूर्णपणे क्रांतिकारक अशा मानसशास्त्रावर अवलंबून आहे आणि हेच तंत्र गीताभारताने सर्व मानव जातीला सांगितले असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.


स्त्रीदास्य आणि जातीदास्य या दोन्हीला एकाच वेळेला मूठमाती देण्यासाठी या संघटनेने राष्ट्रीय गीताभारत जातीदाहिनी हा लढा जाहीर केला आहे. जातीय व्यवस्थेमुळे किंवा स्त्रीदास्यामुळे संपूर्ण मानव जातीचे फार मोठे नुकसान झाले आणि ही गुलामगिरी कायमची संपविण्यासाठी गीताभारतातील उन्नत चेतनेच्या विश्‍वगंगेचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. कायद्याने किंवा भारतीय संविधानातून कितीही प्रयत्न केले तरी स्त्रीदास्य आणि जातीव्यवस्था कायम संपविण्यात येणार नाही. त्यामुळे भारतीय संविधानाला गीताभारताचे क्रायोजनीक इंजिन जोडल्याशिवाय पर्याय नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या चळवळीसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. मेहबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *