प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम
सौंदर्य खुलविण्यासाठी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनापेक्षा वनौषधी अधिक उपयुक्त -विद्या बडवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्य खुलविण्यासाठी केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनापेक्षा वनौषधी अधिक उपयुक्त आहे. आहार, व्यायाम व दिनचर्यावर आरोग्य व सौंदर्य टिकून असते. शारीरिक स्वास्थ्यासाठी निसर्गोपचार हे एक वरदान असून, महिलांनी सौंदर्य खुलविण्यासाठी निसर्गोपचार पध्दतीने स्वतःच्या शरीराची स्वतः काळजी घेण्याचे आवाहन निसर्गोपचार व आहार तज्ञ विद्या बडवे यांनी केले.

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महात्मा फुले चौक येथील सभागृहात महिलांसाठी आयुर्वेदयुक्त निसर्गोपचार व सौंदर्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना विद्या बडवे बोलत होत्या. याप्रसंगी भागीरथी चंदे, शकुंतला जाधव, शशिकला झरेकर, उपाध्यक्षा सविता गांधी, अध्यक्षा अलका मुंदडा, उज्वला बोगावत, शोभा पोखरणा, सुजाता पुजारी, हिरा शहापूरे, उषा गुगळे, स्वप्ना शिंगी, जयश्री पुरोहित, दीपा मालू आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी महिलांच्या आरोग्यासाठी व कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट करुन पाहुण्यांचे त्यांनी स्वागत केले. दीपा मालू यांनी महिलांसाठी विविध बौध्दिक स्पर्धा घेतल्या. बौध्दिक, प्रश्नमंजुषा, तंबोला आदी विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम- अरुणा गांधी, द्वितीय- ज्योती गांधी, तृतीय- उज्वला मालू, उत्तेजनार्थ- सुवर्णा नागोरी, छाया शिंदे यांनी बक्षिस पटकाविली. बक्षिसांसाठी हेमराज केटर्सचे प्रायोजकत्व लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक धायतडक यांनी केले. आभार स्वप्ना शिंगी यांनी मानले.