पाटील हॉस्पिटल आणि मोहरकर आय.सी.यू. चा कामगार दिनाचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटील हॉस्पिटल आणि मोहरकर आय.सी.यू. यांच्या वतीने कामगार दिनानिमित्त सैन्य दलातील एम.ई.एस. विभागात कार्यरत असलेल्या कामगार वर्गाची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला एम.ई.एस. गरिसन इंजिनिअर विभागाच्या कामगार वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन मेजर पी.के. त्रिपाठी यांच्या हस्ते झाले. यावेळी डी.व्ही. दिवटे, डॉ. विजय पाटील, डॉ. शरद मोहरकर, एम.ई.एस कामगार युनियनचे अध्यक्ष ए.बी. चीपाडे, शेखर व्यवहारे, मच्छिंद्र ठोंबरे, संतोष अल्हाट आदींसह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मेजर पी.के. त्रिपाठी यांनी कामगार दिनानिमित्त पाटील हॉस्पिटल आणि मोहरकर आय.सी.यू. यांच्या वतीने एम.ई.एस.च्या कर्मचार्यांसाठी घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. कामगार वर्ग देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलत असून, त्यांच्या आरोग्याप्रती जागरुक राहून घेतलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, ईसीजी, एक्सरे, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेची तपासणी व रक्तातील पेशी तपासणी करण्यात आली. तर सदृढ आरोग्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. विजय पाटील यांनी गुडघे बदल, सांधेबदल, खुबाबदल तसेच हाडांच्या व मणक्याच्या विविध आजारांची मोफत तपासणी केली. मोहरकर आय.सी.यू. चे डॉ. शरद मोहरकर यांनी हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, पचनाचे व श्वसनाचे आजारांची तपासणी केली. या शिबिरासाठी डॉ. गणेश बागल व हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी गोरक्ष जाधव यांनी विशेष सहकार्य लाभले.