उपोषणाचा तिसरा दिवस
त्या कंपनीकडून होत असलेल्या कामगारांच्या शोषणप्रश्नी न्याय मिळण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- माथाडी कामगार कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या पैश्याचे अपहाराची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे, कायनेटिक इंजिनिअरींग कंपनीकडून होत असलेल्या कामगार कायद्याचे उल्लंघन आणि कामगारांच्या शोषणप्रश्नी न्याय मिळण्याच्या मागणीसाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने बालिकाश्रम रोड येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरु करण्यात आले.
सोमवार पासून सुरु झालेल्या या उपोषणाचा बुधवारी (दि.23 नोव्हेंबर) तिसरा दिवस असून, मागण्या पूर्ण होत नाही, तो पर्यंत माघार घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा उपोषण कर्त्यांनी घेतला आहे. या उपोषणात सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, राज्याध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे, किरण शिंदे, रवि वाकळे, दत्ता वामन, तुकाराम डफळ, सर्जेराव आठवले, अनिल कुर्हाडे, अनुराग पडोळे, सचिन वनवे, सविता, नरवडे, अनिता वेताळ, दीपक वर्मा, दत्तात्रेय कोतकर, शाहिर कान्हू सुंबे आदी सहभागी झाले होते.
तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यकाळात माथाडी कामगार व असंरक्षित कामगार मंडळामध्ये बेकायदेशीरपणे वाराई पावती पुस्तक छापून कामगारांच्या पैश्याचा अपहार झाला आहे. दोन्ही टोळीप्रमुखांवर कारवाई करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून 26 मार्च 2018 कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला. याबाबत गुन्हे दाखल होण्यासाठी पोलीसांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र राजकीय दबावामुळे पोलीसांशी संगनमत करुन जाणूनबुजून कागदपत्रात त्रूटी ठेऊन गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली. तर कायनेटिक इंजिनिअरींग कंपनीकडून कामगार कायद्याचे उल्लंघन होत असताना या कंपनीचे निरीक्षण अधिकारी बदलून मर्जीतले अधिकारी यांच्या नावाने नवीन आदेश काढून निरीक्षण करुन खोटा अहवाल सादर केला असल्याचा आरोप सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.
या कंपनीच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले आहे. या कंपनीची भट्टीची चिमणी नियमबाह्य असूनही, कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. मध्यान भोजन योजनेत कामगार कायद्याचे उल्लंघन करून कंपनी इंडो प्रोटीन फुड्स कंपनी व्यवस्थापनाशी संगनमत करून ईएससीआय व पीएफ खाते यांच्याकडे दुर्लक्ष करुन अन्न औषध प्रशासन यांची परवानगी ही नियमबाह्य असतानाही यांना परवानगी देऊन कामगारांचे आर्थिक शोषण केले जात आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय हे निरीक्षण कामगार कायद्याचे कायद्याचे उल्लंघन झाले असतानाही दौंड रोड व नागापूर एमआयडीसी येथील कंपनीचे बेकायदेशीर निरीक्षण झाले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भट्टी कामगार यांना त्यांचे आवश्यक साहित्य दिले जात नसून, आरोग्य नियम पाळले जात नाही. कॅन्टीन चालकाने अन्न व औषध प्रशासन यांची परवानगी घेतलेली नाही. कंपनीतील सांडपाणी हे जवळच्या शेतात सोडले असल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे. दौंड रोड येथील कंपनीत विद्युत पुरवठा पॅनल बोर्डच्या कॅपेसिटीर काढून थेट सप्लाय डायरेक्ट लाईनमधून सुरू केला आहे. हा भाग औद्योगिक वसमतीमधील नसून हा विद्युत पुरवठा देण्यात आला आहे. याला बेकायदेशीरपणे परवानगी देण्यात आलेली आहे. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकारी, कर्मचारी व कंपनी व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.