शाखा व्यवस्थापक व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- सहकार विभागाने कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात जबाबदार धरलेल्या सैनिक बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक व बँकेच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना बडतर्फ होण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांचे मुंबईच्या आझाद मैदानात तिसर्या दिवशीही उपोषण सुरु होते. संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा घेऊन, बँकेतील तब्बल 2 कोटी रुपयाच्या सार्वजनिक रकमेचा अपहार झाल्याचा आरोप रोडे यांनी केला आहे.
रोडे यांनी निवेदनात म्हंटले आहे की, सैनिक बँकेत चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व काही संचालक यांना हाताशी धरत फरांडे गेली 10 वर्ष कर्जत शाखेत शाखा व्यवस्थापक होता. या काळात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार, अपहार, झाला असल्याच्या तक्रारी सहकार खात्याकडे दाखल आहेत. सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत धनादेश क्लिअरिंगमध्ये अफरातफर करून पावणेदोन कोटी रुपयांचा घोटाळा अध्यक्ष शिवाजी व्यवहारे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे व शाखा अधिकारी सदाशिव फरांडे यांच्या सहभागातून झाला असून, वरील सर्वांना जबाबदार धरण्यात आल्याचा अहवाल सहकार विभागाचे पारनेर सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी दिला आहे. त्यामुळे औटी यांनीच सहकार विभागाच्या वतीने फिर्यादी होवून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट केले आहे.
सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, कर्जत येथील चौकशी अधिकारी हे धिम्या गतीने तपास करत असून त्यांचेवर त्वरित दफ्तर दिरंगाई, शिस्तभंग अन्वये कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.