गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता आणि बालकांच्या सोयीसाठी महिलांचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर बस स्थानक येथे गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करण्यास अडचण निर्माण होत असताना माता आणि बालकांच्या सोयीसाठी महिलांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या वतीने हिरकणी कक्ष उभारण्यात आले.
महिलांनी महिलांसाठी पुढाकार घेऊन उभारलेल्या हिरकणी कक्षाचा लोकार्पण आशा थापर यांच्या हस्ते झाला. यावेळी यावेळी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लिडर अन्नू थापर, आगार व्यवस्थापक अभिजीत आघाव, स्थानक प्रमुख विठ्ठल केंगरकार, वाहतुक निरीक्षक सारिका भांड, ग्रुपच्या सदस्या गीता माळवदे, वंदना गोसावी, सविता चड्डा, निलम शहा, अर्चना खंडेलवाल, अनिता मंत्री, गीता नय्यर, नितू आहुजा, मनिषा थापर, गीता तलवार, अन्नू थापर आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, तारकपूर बस स्थानक येथे प्रवाश्यांसह स्तनदा माता बालकांची वर्दळ असते. गर्दीचे ठिकाण असल्याने महिलांना बालकांना स्तनपान करण्यास संकोच व असुरक्षितता निर्माण होते. बाळांना दूध पिण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी सेवाप्रीतच्या महिलांनी पुढाकार घेऊन या कक्षाची उभारणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्नू थापर म्हणाल्या की, या बस स्थानकाच्या हिरकणी कक्षात मातांना सुरक्षितपणे स्तनपान करता येणार आहे. तर महिला व बालकांना काही वेळ विश्रांती देखील घेता येणार आहे. लहान बालकांसह प्रवासात असलेल्या महिलांना बालकांना स्तनपान करण्यास मोठी अडचण निर्माण होते. या दृष्टीने महिलांची ही समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प उभारण्यासाठी सेवाप्रीतला वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल आगार व्यवस्थापक अभिजीत आघाव यांचा सत्कार करण्यात आला. स्थानक प्रमुख विठ्ठल केंगरकार यांनी सेवाप्रीतच्या महिलांचे आभार माणून महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.