तीन दिवस शहरात रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार
अहमदनगर (प्रतिनिधी)- सिटी क्लब चॅम्पियनशिप लीग 2023 सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धा न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात उत्साहात पार पडली. अंतिम अटातटीच्या सामन्यात पॅनल्टीवर ऑल ब्रदर्स संघाने 1-0 गोलने युनायटेड सिटी हॉस्पिटलवर विजय मिळवून सिटी क्लब चॅम्पियनशिपचा चषक पटकाविला. शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी दोन्ही संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले.
या स्पर्धेत शहरातील फुटबॉल संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तब्बल तीन दिवस फुटबॉल स्पर्धेचा थरार प्रेक्षक व फुटबॉल प्रेमींनी अनुभवला. ऑल ब्रदर्स संघ व युनायटेड सिटी हॉस्पिटल संघाच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी 1-1 गोल करुन बरोबरीत राहिले. शेवटच्या क्षणी पॅनल्टीवर ऑल ब्रदर्स संघाने 1-0 गोलने युनायटेड सिटी हॉस्पिटलवर दणदणीत विजय मिळवला.
तर युनायटेड सिटी हॉस्पिटल रनरअप संघ ठरला. तर तृतीय क्रमांक लेंडकर एफसीने मिळवले. प्रथम विजेत्या संघास 21 हजार रोख चॅम्पियनशिप चषक, द्वितीय संघास 11 हजार रोख चषक व तृतीय संघास 7 हजार रोख चषक तर इतर उत्कृष्ट खेळाडूंना सायकल आणि रोख बक्षिसं देण्यात आली. प्रथम बक्षिसाचे प्रायोजक गजेंद्र भांडवलकर, द्वितीय बक्षिसाचे झिशान शेख तर तृतीय बक्षिसाचे शशांक कर्णिक होते.

विजेत्या संघास डॉ. इमरान शेख, उद्योजक संतोष जाधव व सिटी क्लबचे संस्थापक अध्यक्ष शशांक कर्णिक यांच्या हस्ते बक्षिस प्रदान करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे आयोजक गणेश गायकवाड, आयुष कांबळे, आकाश गायकवाड, महेश पटेकर, उमर शेख, अभिषेक सोनवणे, अक्षय बोराडे आदींसह खेळाडू व फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप, उद्योजक पै. अफजल शेख व गजेंद्र भांडवलकर यांनी विजेत्या संघास व स्पर्धेत यश प्राप्त करणार्या उत्कृष्ट खेळाडूस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात आयोजक गणेश गायकवाड यांनी फुटबॉल खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

डॉ. इमरान शेख म्हणाले, शहर व उपनगरातून फुटबॉलचे चांगले खेळाडू पुढे येत आहे. अशा स्पर्धेतून खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असून, फुटबॉल खेळासाठी नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मैदानी खेळ जिंकण्याची उमेद, तर हारलेल्यांना पुन्हा जिद्दीने मैदानात उतरण्याची प्रेरणा देत असतो. मैदानातील खेळाडू जीवनात कधीही अपयशी ठरत नसल्याचे त्यांनी सांगितले.

शशांक कर्णिक म्हणाले की, पंचवीस वर्षांपूर्वी फुटबॉल खेळाडूंना घडविण्यासाठी सिटी क्लबची स्थापना करण्यात आली. क्लबच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट खेळाडू घडविण्यात आले आहे. नवोदित खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने स्पर्धा भरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत बेस्ट प्लेअर- रौनक जाधव, बेस्ट डिफेन्स- शुभम धीवर, बेस्ट टूर्नामेंट- आयुष वाघुले, बेस्ट गोलकीपर- लिओ, स्कोर ऑफ टूर्नामेंट उमर शेख ठरले.
