पै. संदिप डोंगरे याने पाच मिनीटात केली चितपट कुस्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- सारोळा कासार (ता. नगर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. निर्गुनशहावली बाबा यांच्या यात्रेनिमित्त गावात कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. या रंगतदार कुस्त्यांच्या थरारात पै. संदिप डोंगरे याने पाच मिनीटात चितपट कुस्ती केली.
निमगाव वाघा येथील पै. संदिप डोंगरे विरुध्द पारनेर येथील पै. अविनाश कराळे यांच्यात कुस्ती रंगदार झाली. यामध्ये पै. संदिप डोंगरे याने उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करुन मोळी डावावर अविनाश कराळे याला पाच मिनीटात चितपट केले. चितपट कुस्ती करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विजयी मल्लास दाद दिली.

ग्रामस्थांनी विजयी मल्ल डोंगरे पैलवान याला रोख बक्षिस देऊन व फेटा बांधून सत्कार केला. तर या कुस्ती मैदानात पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस, जयप्रकाश कडूस, पंच राजाराम धामणे, सुभेदार शंकर खोसे, अजय अजबे, पै. विष्णू खोसे, प्रा. बाळासाहेब कडूस, उत्तम कडूस आदी उपस्थित होते.
विजयी मल्ल संदिप हे नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे चिरंजीव असून, तो वाडियापार्क तालिम येथे वस्ताद पै. अनिल गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. विजयी झालेल्या संदिप डोंगरे याचे टाकळी काझी विद्यालयाचे प्राचार्य कुमार म्हस्के, हरीचंद्र ढगे, बबन शेळके, मच्छिंद्र गायकवाड, माजी सरपंच साहेबराव बोडखे, डॉ. विजय जाधव, गोकुळ जाधव यांनी अभिनंदन केले.