विविध प्रकारच्या 1400 रोपांची केली जाणार लागवड
ग्रामस्थांनी वृक्षसंवर्धनासाठी सहकार्य करावे -हेमंत उबाळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने पिंपळगाव वाघा ते जखणगाव रस्त्याच्या 1400 मीटर अंतरावर रस्ता दुतर्फा 1400 वृक्ष लागवडीच्या कामाचा शुभारंभ वृक्षरोपणाने करण्यात आला. यावेळी सरपंच सुलोचना नाट, ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई शिंदे, पोपट वाबळे, गयाबाई नाट, सोन्याबापू नाट, रोजगार सेवक संतोष वाबळे आदींसह ग्रामस्थ व लागवडीचे काम करणाऱ्या गावातील महिला उपस्थित होत्या.
वनक्षेत्रपाल हेमंत उबाळे म्हणाले की, वृक्षरोपणामुळे निसर्गाचे समतोल साधले जावून, पर्यावरणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. ढासाळलेल्या निसर्गाचे समतोल साधण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. ग्रामस्थांनी देखील वृक्षसंवर्धनासाठी सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
वनरक्षक अफसर पठाण म्हणाले की, गावोगावी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने होत असलेल्या रस्ता दुतर्फा वृक्षरोपणाने परिसराचे सुशोभीकरण होणार असून, जमिनीची धूप थांबून पर्यावरणाचे संरक्षण होणार आहे. तर भविष्यात वृक्षांमुळे पक्ष्यांना निवारा देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, वाढत्या गरजा, अन्नधान्य, कारखाने, उत्पादने यांची वाढती लोकसंख्यानुसार मागणी तसेच अनाठायी गरजा भागविण्यासाठी निसर्गाच्या वनसंपत्तीला नष्ट केले. मनुष्य निसर्गावर घाला घालून आपली हाऊस करताना निसर्गाचे नुकसान करुन स्वत: संकटाला आमंत्रण देत आहे. त्याचे दुष्परिणाम मानवांना भोगावे लागत असून, झाडांशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय प्राणी जीवन नसल्याचे सांगून, वृक्षरोपण चळवळीला हातभार लावण्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्याच्या दुतर्फा प्रामुख्याने करंज, सीताफळ, चिंच, आंबा, आवळा, कांचन, लक्ष्मीतरु अशा विविध प्रजातींची रोपे लागवड केली जात आहे. पिंपळगाव वाघा ते जखणगाव रस्त्याच्या दुतर्फा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत वनक्षेत्रपाल उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौदाशे रोपांची लागवड करण्यात येत आहे. रोपांची लागवड व त्याच्या संरक्षण, संवर्धनाचे काम गावातील महिला मजूर पाहत आहे. या वृक्षाच्या संवर्धनासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तीन वर्षे देखभाल केली जाणार आहे.