• Fri. Nov 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीत गैरकारभार प्रकरण तापले

ByMirror

Nov 13, 2026
30 नोव्हेंबरपर्यंत कारवाईचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांच्या उपोषणानंतर तालुकास्तरीय चौकशी समिती गठित


30 नोव्हेंबरपर्यंत कारवाईचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील ग्रामपंचायत (ता. नगर) येथील संगम चौकातील पावन गणेश मंदिराजवळील ग्रामपंचायत आणि शासनाच्या जागेवर झालेल्या अनधिकृत बहुमजली बांधकाम प्रकरणात आणि शासकीय अभिलेखात फेरफार केल्याप्रकरणी अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने अनियमितता झाल्याची लेखी कबुली दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ता हरीभाऊ जाधव यांच्या सातत्यपूर्ण कायदेशीर पाठपुराव्यामुळे आणि 12 नोव्हेंबर 2026 रोजी छेडलेल्या आमरण उपोषणामुळे प्रशासनाला अखेर जाग आली आहे. पंचायत समिती अहिल्यानगरचे गटविकास अधिकारी अक्षय गार्डे यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन दिलेल्या अधिकृत लेखी पत्रामध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या पत्रामध्ये या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.


संगम चौकातील पावन गणेश मंदिराशेजारील ग्रामपंचायत व महाराष्ट्र शासनाच्या जागेवर कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय एका व्यक्तीने अनधिकृत बहुमजली बांधकाम सुरू केले आहे. या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या दि. 27.05.2025 च्या अधिकृत मासिक सभेच्या प्रोसिडिंगमध्ये नंतर परस्पर फेरफार करून मिळकत क्र. 891 घुसडण्यात आली. तसेच त्याच आधारावर दि. 24.07.2025 रोजी एकाच जावक क्रमांकाने दोन वेगवेगळ्या आशयाचे ‘ना हरकत’ दाखले निर्गमित करण्यात आले व पुढे मिळकत क्र. 891/2 चा देखील परस्पर समावेश करण्यात आला.


विशेष म्हणजे, ज्या महिला सदस्यांना या ठरावासाठी सूचक व अनुमोदक दाखवण्यात आले होते, त्यांनी प्रत्यक्षात असा कोणताही ठराव चर्चेला आलाच नव्हता आणि आपण सूचक-अनुमोदक झालोच नाही, असे लिखित स्वरूपात प्रशासनाला कळवले आहे. यावरून सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी संगनमताने थेट शासकीय अभिलेखात कसे फेरफार केले, हे उघड झाले आहे.
दत्ता जाधव यांनी या संपूर्ण भ्रष्टाचाराविरोधात 17 सप्टेंबर 2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. कसलीही कारवाई न झाल्याने 12 ऑक्टोबर 2026 रोजी स्मरणपत्र देण्यात आले, अखेर न्याय मिळेपर्यंत 12 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले.


त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने, या प्रकरणी तालुकास्तरावर चौकशी समिती गठित केली असून 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत चौकशी अहवाल सादर करून त्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन दिले आहे.
चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीत असा गैरकारभार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2018-19 मध्येही तत्कालीन गटविकास अधिकारी आय.ए. एस. असिमा मित्तल यांनी येथील गैरकारभार सिद्ध करत कारवाईचे आदेश दिले होते. यामुळे गावात वर्षानुवर्षे कागदोपत्री गैरव्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोप दत्ता जाधव यांनी केला असून, ग्रामपंचायतीचा मागील 10 वर्षांचा सर्वंकष कारभार तपासावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. प्रशासनाने 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली असली, तरी त्यावर ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *