भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले असताना सरसकट नुकसानग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य संपर्कप्रमुख अशोक आंधळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष वाडेकर, साईनाथ घोरपडे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, शेतकरी संघटनेचे संजय तोडमल, पारनेर तालुका उपाध्यक्ष अमोल करंजेकर, सागर खाडे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिह्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामातील शेतकर्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासन पंचनाम्याचे ढोंग करून जाणीवपुर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. पंचनामे ठराविक ठिकाणीच होत असलयाचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थीत सर्वसामान्य शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत जाहीर करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा शेतकर्यांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
