• Fri. Jan 30th, 2026

सदृढ आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा संदेश देत शहरात पार पडली सायकल राईड

ByMirror

Feb 18, 2023

हर हर महादेव…, छत्रपती शिवाजी महाराज की जय!… घोषणा देत सळसळत्या उत्साहात सायकलपटूंचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- सदृढ आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा संदेश देत महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात सायकल राईड पार पडली. जायंट रायडिंग क्लब ऑर्गनायझेशन अंतर्गत मराठा सायकलच्या वतीने सायकलिंग राईडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 75 सायकलपटूंनी सहभागी नोंदवला.


पहाटेचे अल्हाददायक थंड वातावरणात हर हर महादेव…, छत्रपती शिवाजी महाराज की जय!… घोषणा देत सळसळत्या उत्साहात सायकलपटूंनी सायकल राईडला सुरुवात केली. नगर-मनमाड रोड येथील मराठा सायकल येथून प्रीतम भागवानी यांच्या मार्गदर्शनाखाली या राईडचे प्रारंभ झाले. धुंद धुंद हवा, मंद मंद गारव्यात सुरु झालेल्या राईडचे लीड आंतरराष्ट्रीय सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी केले. यामध्ये चंद्रशेखर मुळे, नितीन पाठक, सिद्धार्थ सोनवणे, सार्थक लोहार, अमोल कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, अल्ताफ शेख, विष्णू बनसोडे, कौशिक बारगळे, मनोज इंगळे आदी सायकलपटू सहभागी झाले होते.


एरवी शांत असणारे रस्ते, पहाटे साडेसहा वाजता सायकल राईडने गजबजून गेले. सूर्य उगवत असताना सायकपटूंनी देवदरीचा घाट चढण्यास सुरुवात केली. वार्‍याशी स्पर्धा करत सायकलींचा जथ्था एकामागोमाग धावत होता. शारीरिक क्षमतेचा कस लावत घाट पार करुन सायकलपटूंनी देवदरी, आगडगाव, जेऊर व शेंडी बायपास रस्त्याने मार्गक्रमण करुन या राईडचे प्रारंभ झालेल्या ठिकाणी समारोप केला. यामध्ये महिला सायकलपटूंनी देखील सहभाग नोंदवला. सर्व सायकल पटूंना अहमदनगर सायकलिंग क्लबचे गौरव फिरोदिया यांच्या वतीने हायड्रेशन सपोर्ट देण्यात आले.


प्रीतम भागवानी म्हणाले की, सदृढ आरोग्य व प्रदुषणमुक्तीसाठी सायकल चळवळ रुजण्याची गरज आहे. व्यायामासाठी सायकल अत्यंत उपयुक्त असून, वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदुषण देखील टाळता येणार आहे. या जनजागृतीसाठी आणि सायकल चळवळीच्या प्रसारासाठी दर महिन्याला दोन राईडचे आयोजन करण्यात येत असून, ही चौथी राईड पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *