• Wed. Nov 5th, 2025

सत्ताधारी धार्मिक द्वेषाच्या राजकारणाने भावी पिढी बरबाद करत आहे -इंजि. केतन क्षीरसागर

ByMirror

Feb 5, 2023

एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्ताधारी भाजप सरकार नागरिकांच्या डोळ्यात विकासाची धूळफेक करुन, धार्मिक द्वेषाचे राजकारण करून भावी पिढी बरबाद करू पाहत आहे. धर्मा-धर्मात जातीय तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सुरु आहे. देशाचा विकासदर खालावला जात आहे, तर गोरगरिबीचा उच्चांक झाला आहे. या महत्त्वाच्या मुद्दयांना बगल देण्यासाठी धार्मिक द्वेषाला खतपाणी घातले जात असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी केले.


एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत सावेडी, गुलमोहर रोड येथील आमदार संग्राम जगताप यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी इंजि. क्षीरसागर बोलत होते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीप्रसंगी अ‍ॅड. रविंद्र शितोळे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, क्रीडा सेलचे घनश्याम सानप, व्यापार व उद्योग सेलचे अनंत गारदे, युवती सेलच्या अंजली आव्हाड, सुमित कुलकर्णी, सुजाता दिवटे, श्रीकीर भोसले, सुनिल पवार, अभिजीत सपकाळ, मयूर रोहोकले, निलेश ढवण, साहिल पवार, आशुतोष पानमळकर, चेतन क्षीरसागर, पंकज शेंडगे, अनिकेत पानमळकर, मच्छिंद्र चिपाडे, अक्षय नागवडे, किरण घुले, दीपक गोरे, प्राजक्ता जोशी, शुभम जोशी, अमोल काजळे, प्रशांत पालवे, गौरव हरबा, गजेंद्र भांडवलकर, संकेत मारवडे, केतन ढवण, मच्छिंद्र चिपाडे, ललित क्षीरसागर, ओंकार म्हसे, दिपक वाघ, कुनाल ससाणे, तुषार टाक, कुमार नवले, सनी वाघमारे, निहाल जाधव, करण ससे, सचिन महाजन, अभिजीत ढाकणे आदींसह परिसरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे इंजि. क्षीरसागर म्हणाले की, शहरात आमदार संग्राम जगताप यांनी धर्म व जातीचे राजकारण न करता, विकास हाच राजकारण अजेंडा घेऊन सर्वसामान्यांना सुविधा देण्याचे काम करत आहे. मागील तीस वर्षापूर्वी आपल्या शहराच्या तुलनेत इतर शहरांचा मोठा विकास झाला. मात्र पाच ते सात वर्षात शहराचा विकास दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे. इतर पक्षातील नेते स्वतःच्या पक्षात आणण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जाते आहे. तर ईडीच्या कारवाया देखील केल्या जात आहे. भाजपच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही, फक्त जाहिरातबाजी व विकासाचा बागुलबुवा निर्माण केला जात आहे. बेरोजगार युवकांचा प्रश्‍न गंभीर होत असताना, महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प पळविण्याचे काम केले जात आहे. भाजपचे नेते, मंत्री महापुरुषांचा अपमान करत आहे. राष्ट्रवादी पक्ष पुरोगामी विचाराणे धर्मनिरपेक्षपणे सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रारंभी शहर सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल प्रा. माणिक विधाते व रेश्मा ठाकरे यांचा यावेळी उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अंजली आव्हाड म्हणाल्या की, शहरात ठेकेदाराकडून महापालिकेने काम करून घेणे आवश्यक आहे. रस्त्याची कामे मार्गी लावण्यासाठी आमदार जगताप यांनी राज्य शासनाकडून मनपाला निधी उपलब्ध करुन दिला. मात्र कामे प्रलंबीत ठेवली जात आहे. गुलमोहर रस्त्याची बिकट परिस्थिती होती. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने किमान या कामाला गती मिळाली असून, त्यांच्या पुढाकाराने हा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे त्या म्हणाल्या. रेश्मा आठरे म्हणाल्या की, पक्षाचे धोरण, विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे पक्षाशी सर्वसामान्य नागरिक जोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने पूर्वीपेक्षा सध्या मोठा बदल जाणवत आहे. काही वर्षापासून चांगला सकारात्मक बदल दिसत असून, शहर हे विकासाच्या दृष्टिकोनाने मार्गक्रमण करीत आहे. लवकरच नगर शहर मोठे शहर म्हणून नावरुपास येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *