रविदास महाराजांचे विचार आजही प्रस्थापितांच्या अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा देतात -संजय खामकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने संत गुरु रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. चर्मकार विकास संघाच्या सावेडी येथील कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संत गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमेस चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ठोसर गुरुजी, नानासाहेब कदम, अरुण गाडेकर, प्रा.डॉ. रमाकांत जाधव, देवराम तुपे, आदिनाथ बाचकर, विलास जतकर, विकास गुजर, विनोद कांबळे, निलेश आंबेडकर, महेश सातपुते, अंबादास तेलोरे, दिलीप कांबळे, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, चौदाव्या शतकात कर्मकांड, अंधश्रध्दा, अज्ञान, भिती व गुलामगिरीत जोखडलेल्या समाजाला संत गुरु रविदास महाराजांनी प्रकाश वाट दाखवली. निर्भीडपणे समानता व मानवतेचा संदेश देऊन, ही क्रांतीकारी चळवळ अतिशय आत्मविश्वासाने रविदास महाराजानी चालविली. त्यांचे विचार आजही प्रस्थापितांच्या अन्यायाविरुध्द बंड करण्याची प्रेरणा देतात. त्यांनी माणसामधील द्वेष व भेदभाव नष्ट करण्याचे काम केले. समता व बंधूभावाची बीजे त्यांनी रोवली असल्याचे त्यांनी सांगितले.
