श्री दक्षिणमुखी विशाल हनुमान देवस्थान येथे रक्तदानाने हनुमान जन्मोत्सव साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सेवाभावाने गरजूंना 20 रुपयात जेवण पुरविणार्या श्री हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठान संचलित हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर्स ग्रुपच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त भोजन गृहाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. बोल्हेगाव गांधीनगर जवळील श्री दक्षिणमुखी विशाल हनुमान देवस्थान येथे हा कार्यक्रम पार पडला. तर यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवकांसह भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
श्री दक्षिणमुखी विशाल हनुमान देवस्थानमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर्स ग्रुपच्या वतीने प्रेमदान चौकात मागील चार वर्ष कोरोनाच्या टाळेबंदीपासून गरजूंना 20 रुपयात जेवण पुरविण्यात येत आहे. या सेवा कार्यासाठीभोजन गृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले असून, याचे भूमिपूजन राजेंद्र मालू यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब (नाना) भोरे, उपाध्यक्ष संगिता भोरे, नगरसेवक कुमार वाकळे, आशिष शिंदे, ज्ञानेश खुडे, बंडू शिंदे, किशोर कुलकर्णी, स्मिता खुडे, प्रीतम फिरोदिया, विक्रांत भोरे, ओंकार भोरे, बाळासाहेब शिंदे, ऋषिकेश शिंदे, प्रशांत सिध्द, रोनक साबळे, सचिन गारदे आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंद्र मालू म्हणाले की, हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर्स ग्रुप मानवसेवेचे कार्य करत आहे. ही सेवा अविरत सुरु राहण्यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भोरे म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरु झालेली ही सेवा अद्यापि सुरु आहे. अनेक गरजूंना अल्पदरात जेवण पुरविण्यात येत आहे. तर चिपळूण येथे महापुरात लोकांना मदत देऊन जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत लोकसहभागाने हे सेवा कार्य सुरु असून, कार्याचे विस्तार करण्यासाठी भोजन गृह उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री दक्षिणमुखी विशाल हनुमान देवस्थानमध्ये असलेल्या पूर्णकृती विशाल हनुमान मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.