इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार, टोलवाटोलवी आणि सत्तापेंढारींना संपविण्यासाठी श्रीराम नवमीनिमित्त इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेच्या वतीने लोकभज्ञाक मतफत्ते व डिच्चूफत्ते या दोन रामबाण लोकास्त्र जारी करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामांना साक्ष ठेऊन कोणत्याही अमिषाला बळी न पडता चांगल्या उमेदवारांना निवडून देऊन क्रांतीकारक बदल घडविण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
सत्तापेंढारी जाती-धर्माचे राजकारण करुन, मतदारांना दारु, पैश्याचे अमिष देऊन व खोटे आश्वासने देऊन सत्ता मिळवतात. मिळवलेल्या सत्तेचा वापर ते लोककल्याणासाठी करत नाही. शासनाची तिजोरीवर डल्ला मारुन स्वत:चे हित जोपासण्याचे काम ते करत असतात. सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता हे राजकारणाची रीत बनली आहे. यामुळे देशात भ्रष्टाचार, टोलवाटोलवी फोफावली आहे.
भ्रष्टाचार, टोलवाटोलवी जादूच्या कांडीने संपणार नसून, त्यासाठी सत्तापेंढारींना संपवून त्यांच्या जागी चांगले लोकप्रिनिधी निवडून द्यावे लागणार आहे. लोकभज्ञाक मतफत्ते म्हणजे नागरिकांनी फक्त मतदान करण्यापुरते मर्यादित न राहता, चांगल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे व त्याला मतदान करुन निवडून आणणे होय. तर डिच्चूफत्ते म्हणजे सत्तापेंढारींना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी गनिमी काव्याने त्यांना डिच्चू देणे असा असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भ्रष्टाचार व अनागोंदी आंदोलन, उपोषणाने संपणार नसून, याला संपविण्याचे अस्त्र लोकांच्या हातात मतदान स्वरुपात आहे. लोकपाल कायदा आला, मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नाही. भ्रष्टाचार दिवसंदिवस वाढत आहे. मत विकत घेणारा लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काम करणार नाही, हे जनतेने लक्षात घेण्याची गरज आहे. ज्या प्रमाणे प्रभू श्रीरामाने रावणाला संपवले या भ्रष्टाचार व अनागोंदीचा मुळ असलेला सत्तापेंढारी रावण संपविण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी या लढाईत उतरून मतफत्ते व डिच्चूफत्ते रामबाण लोकास्त्राने सत्तापेंढारींना संपविण्याचे आवाहन करण्यात आले असून, या चळवळीसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. महेबूब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम, तुकाराम बोरगे आदी प्रयत्नशील आहेत.