गर्भवती महिलांना सदृढ आरोग्यासाठी सकस आहार व योगचा अवलंब करण्याचे आवाहन
गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी योग्य आहार व योग महत्त्वाचा -डॉ. मिरा बडवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी योग्य आहार व योग महत्त्वाचा आहे. तज्ञ डॉक्टर व महिलांमध्ये संवाद वाढल्यास अनेक शंकाचे निरसन होऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. गर्भवती महिलेने आपल्यासह येणार्या बाळाच्या आरोग्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन स्त्री रोग तज्ञ डॉ. मिरा बडवे यांनी केले.
स्टेशन रोड येथील श्रीदीप हॉस्पिटल क्रिटिकल केअर अॅण्ड ट्रॉमा युनिटच्या वतीने गर्भवती महिलांसाठी आरोग्यावर निशुल्क मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. बडवे बोलत होत्या. या व्याख्यानास मार्गदर्शक म्हणून आहार तज्ञ अर्चिता बंदेल्लू, योग प्रशिक्षिका नेत्रा नाबरिया, डॉ. अंजू घुले, स्त्री रोग तज्ञ डॉ. सुवर्णा होशिंग उपस्थित होत्या.

पुढे डॉ. बडवे यांनी प्रसूती नंतर देखील शरीराची झीज भरून काढण्यासाठी आहाराकडे लक्ष न दिल्यास अनेक व्याधी उद्भवतात. यासाठी महिलांना आहार व व्यायाम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आहार तज्ञ अर्चिता बंदेल्लू म्हणाल्या की, चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. महिला कुटुंबातील सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष देते, मात्रतिला त्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसते. निरोगी आरोग्यासाठी सकस व योग्य आहार महत्त्वाचा आहे. प्रसुतीची तयारी व नंतर देखील महिलांनी आहाराकडे लक्ष दिल्यास स्वत:चे व बाळाचे आरोग्य चांगले ठेवता येणार असल्याचे सांगून, त्यांनी गरोदरपणातील सकस आहार, आहारातील गैरसमजुती, वजन व्यवस्थापन, संतुलित आहार, ग्लेक्टोगोग्सच्या समस्या आदी विषयावर मार्गदर्शन केले.
योग प्रशिक्षिका नेत्रा नाबरिया बदलत्या जीवनशैलीत योग निरोगी आरोग्यासाठी वरदान ठरत आहे. गरोदर महिलांसाठी त्याचे अनेक फायदे असून, योग्य सल्ल्याने गर्भावस्थेत योग करण्याचे त्यांनी आवाहन केले. विविध आसने त्यांनी महिलांना सोप्या पध्दतीने समजवून सांगितले. तर गरोदरपणातील पाठदुखी, कंबरदुखीसाठी योगचा चांगला लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन गर्भावस्थेत योगाचे फायदे व त्याचे महत्त्व सांगितले.
