• Sat. Mar 15th, 2025

श्रीगोंदा दूध भेसळ प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा

ByMirror

May 12, 2023

तर तपास अधिकारी बदलून उपविभागीय दर्जाच्या अधिकारी कडून तपास करण्याची मागणी

बहुजन समाज पार्टीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा येथील दूध भेसळ प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या प्रकरणातील तपास अधिकारी बदलून उपविभागीय दर्जाच्या अधिकारी कडून तपास करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तर श्रीगोंदा तालुक्यात आदिवासी, मागासवर्गीय कुटुंबीयांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी बसपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, शहराध्यक्ष राजू शिंदे, गणेश बागल आदी उपस्थित होते.


श्रीगोंदा तालुक्यामध्ये झालेले दूध भेसल प्रकरणातील आरोपी गावात सर्रास फिरत आहे. राजकीय दबाव असल्याने त्यांना अटक केली जात नाही. समाजाशी व लहान मुलांच्या जीवाशी खेळणारे हे नराधम पोलीसांच्या आशीर्वादाने बाहेर फिरत असल्याचा आरोप बसपाच्या वतीने करण्यात आला आहे.
दूध भेसळप्रकरण उघड झाल्यानंतर तात्काळ एका दिवसात एक लाख लिटरने दूध कमी झाले. पूर्वी 1 लाख 60 हजार लिटरचा पुरवठा होत होता. अचानक एका दिवसाला 60 हजार लिटर दूध येऊ लागले आहे. यामध्ये कोणाच्या दूधाचा पुरवठा बंद झाला याचा तपास होण्याची गरज आहे. दूधावर अनेकांनी कोट्यावधीची संपत्ती कमावली असून, दुसर्‍या बाजूला समाजातील येणारी पिढी रोगग्रस्त बनली व भेसळयुक्त दूधाचे दुष्परिणाम समोर येत आहे. हे प्रकरण अतिशय व्यापक व गंभीर असून तपास अधिकार्‍यांकडून मोठ्या कारवाईची समाजाला आशा होती. परंतु राजकीय दबावामुळे हा तपास पुढे सरकत नसल्याने लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. तात्काळ तपास अधिकारी बदलण्यात यावा व सर्वसामान्य नागरिक व बालकांच्या जीवाशी खेळणार्‍या नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करुन सावकाशपणे तपास करणार्‍या अन्न व औषध प्रशासन विभागाची देखील चौकशी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


तसेच श्रीगोंदा तालुक्यामध्ये दलित, मागासवर्गीय अत्याचार वाढत असून, तीन चार दिवसापूर्वी बापू माने या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व त्यांच्या कुटुंबावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याचे पुरावे पोलीस स्टेशनला देऊनही आरोपी पकडले जात नाही. श्रीगोंदा तालुक्यामध्ये आदिवासी व मागासवर्गीय कुटुंबांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अन्याय, अत्याचार केले जात आहे. प्रस्थापित पक्षाचे पुढारी, जातीवादी गुंड त्रास देण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट करुन हा मागासवर्गीय कुटुंबीयांवर होणारे अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्या व अहमदनगर जिल्हा दलित अत्याचारी जिल्हा म्हणून घोषित करण्याचे म्हंटले आहे. तर सदर प्रश्‍नी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर 22 मे रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा बसपाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *