मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष
प्रत्यक्ष शिक्षण व मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा विकास -बी.टी. थोरात
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा ज्योतचे शिस्तबध्द संचलन, मैदानात रंगलेला विविध क्रीडा स्पर्धेचा थरार, तर मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार पडला.



मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी बी.टी. थोरात यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व मैदानाचे पूजन करुन वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन झाले. संस्थेचे विश्वस्त तथा राष्ट्रीय क्रीडापटू राजेंद्र म्याना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी मनपा शिक्षक मंडळाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण, केंद्रसमन्वयक अरुण पालवे, संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात विद्या दगडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व कला-क्रीडा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत शशिकांत गोरे यांनी केले.
प्रशासनाधिकारी बी.टी. थोरात म्हणाले की, प्रत्यक्ष शिक्षण व मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो. मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले असल्यास विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवता येते. यासाठी मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना मैदानाकडे घेऊन जाण्याचे व स्पर्धा परीक्षेत उतरविण्याचे पालकांना त्यांनी आवाहन केले.

अरुण पालवे म्हणाले की, कष्टकरी, कामगारांच्या मुलांना घडविण्याचे कार्य मार्कंडेय विद्यालय करत आहे. जीवनात पुढे जाण्याची उमेद व जिद्द मैदानी खेळातून निर्माण होत असते. खेळाडूवृत्ती अंगीकारणारा विद्यार्थी जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय क्रीडापटू राजेंद्र म्याना यांनी शालेय बालपण जीवनातील ध्येय ठरविण्यासाठी असते. या वयात मोठी स्वप्न पाहून उर्वरीत आयुष्य ही स्वप्न जिद्द, मेहनतीने साकारण्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटनानंतर खो-खो, कबड्डी, धावणे, लांब उडी आदी विविध सांघिक व मैदानी स्पर्धा रंगल्या होत्या. या स्पर्धेत मोठ्या संख्येने शालेय खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वरुडे यांनी केले. आभार सुजाता सिद्दम यांनी मानले.

